दत्तक घेतलेल्या नाशिकला बोंब पाडली नाही, जळगावात भाजपा काय विकास करणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:44 PM2018-07-30T12:44:35+5:302018-07-30T12:45:12+5:30
दादा भुसे यांचे टिकास्त्र
जळगाव : नाशिक मनपाच्या निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतल्याचे जाहीर केले होते. तसेच विकासासाठी २०० कोटी रुपये देवू असे आश्वासन दिले होते. मात्र, आज वर्ष संपल्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या विकासासाठी एक रुपया दिला नाही. दत्तक घेतलेल्या नाशिकचा विकास ते करु शकले नाही. तर जळगाव शहराचा काय विकास करतील, असा सवाल ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी येथे केला.
शिवसेनेच्या उमेदवारांसाठी रविवारी रात्री ८ वाजता गणेश कॉलनी चौकात आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह प्रभागातील सर्व शिवसेनेचे व पुरस्कृत उमेदवार उपस्थित होते. संजय सांवत यांनी भाजपाला चांगलेच धारेवर धरत भाजपाचे जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्यावर चांगलीच टीका केली.
सुरेशदादांचे ‘नाम ही काफी है’
भाजपच्या जुमल्यांमध्ये किंवा त्यांच्या फेकमफाक मध्ये न अडकता सुरेशदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहराचा विकास करून घ्या असेही दादा भुसे म्हणाले. शहराच्या विकासासाठी सुरेशदादांचे केवळ ‘नाम ही काफी है’ असे भुसे यांनी सांगितले.
सुरेशदादांना यातना देणाºयांना जळगावकर धडा शिकवतील!
सुवर्णनगरी, व्यापार नगरी, केळीची नगरी अशी ओळख जळगावची राज्यात असून ही ओळख केवळ सुरेशदादा जैन यांनी निर्माण केली आहे. त्यांनी शहराचा विकास केल्यावर देखील राजकारणातील काही अपप्रवृत्तीने त्यांना बदनाम करण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, त्यातून सुरेशदादा सुखरुप निघाले.
सुरेशदादा यांना यातना देणाºयांना जळगावकर या निवडणुकीत धडा शिकवतील असेही अर्जुन खोतकर म्हणाले.
योगेश पाटील यांना अडविले
दरम्यान, सभा सुरु होण्याआधी प्रभाग ७ ड मधील उमेदवार योगेश पाटील यांनी व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला.