जिल्हाधिकाऱ्यांची धडपड कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:55 PM2018-12-02T12:55:06+5:302018-12-02T12:56:42+5:30
विश्लेषण
-सुशील देवकर
जळगाव- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनमध्ये झालेल्या टंचाई आढावा बैठकीत बसण्याची परवानगी स्वत: पालकमंत्र्यांनी दिल्यानंतरही जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी पत्रकारांना या बैठकीतून उठून जायला भाग पाडले. त्यामुळे बैठकीतील चर्चा दडविणे, हाच जिल्हाधिकाºयांचा हेतू असल्याचे स्पष्ट झाले. बैठकीतील चर्चा दडविण्याची धडपड कशासाठी? ही माहिती पत्रकारांना समजली तर काय होईल? अशी भिती जिल्हाधिकाºयांना वाटण्याचे कारण काय? असे अनेक सवाल यामुळे उपस्थित झाले आहे.
जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडून नेहमीच गोपनीयतेचे धोरण राबविले जाते. कुठलीही माहिती त्यांना विचारली की ती देण्यास सोयीस्करपणे टाळाटाळ केली जाते. वेळप्रसंगी ‘नो-कॉमेंटस्’ म्हणून थेट नकार देतात. त्या उलट कुठल्याही वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध न करणाºया काहींना मात्र सोयीस्करपणे आतील खबरा देण्याचे कामही करीत असतात. मग या व्यक्ती सोशलमिडीयावरून या बाबी जाहीर करीत असतात. याबाबत पत्रकारांनी वेळोवेळी थेट जिल्हाधिकाºयांकडेच जाहीरपणे नाराजी व्यक्तही केली आहे. मात्र तरीही परिस्थितीत फरक पडलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांना त्यांचे प्रशासन चालविण्यापेक्षाही राजकारण करण्यातच अधिक रस आहे की काय? अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
शनिवार, १ डिसेंबर रोजी तर स्वत: पालकमंत्र्यांनी पत्रकारांना बैठकीस बसू देण्याची सूचना करूनही जिल्हाधिकारी मात्र अस्वस्थ होते. त्यांनी त्यांच्या हाताखालच्या अधिकाºयांमार्फत पत्रकारांना बैठकीतून निघून जाण्याबाबत वारंवार सूचना केल्याने अखेर पत्रकारांना सुरू असलेल्या बैठकीतून बाहेर पडावे लागले. मात्र त्याचवेळी सभागृहातच प्रवेशद्वाराजवळ सर्वसामान्य नागरिक मात्र उपस्थित होते. म्हणजेच बैठकीतील चर्चा त्या नागरिकांनी ऐकली तर चालेल मात्र पत्रकारांनी ऐकायला नको. कारण त्याचा आधार घेऊन ते ‘पोलखोल’ करतील, अशी भिती तर जिल्हाधिकाºयांना वाटत नाही ना? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.