उन्मेश पाटलांना भाजपने काय कमी दिले? अजित चव्हाण यांचा सवाल
By सुनील पाटील | Published: April 4, 2024 02:40 PM2024-04-04T14:40:43+5:302024-04-04T14:41:56+5:30
मतदारच त्यांना जागा दाखवतील असे आव्हान भाजपचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांना केला.
जळगाव : उन्मेश पाटील यांना भाजपने आमदार केले, खासदार केले. रस्त्यावरुन उचलून नाव दिले. इतकेच काय मागील निवडणुकीत स्मिता वाघ यांचे तिकिट कापून उमेदवारी दिली. वाघ सिनिअर आहेत, त्यांचे तिकिट का कापले असे तेव्हा का नाही म्हटले. उन्मेश पाटील यांच्याकडे उत्तर नाही. मतदारच त्यांना जागा दाखवतील असे आव्हान भाजपचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांना केला.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त बुथ विजय अभियान राबविले जाणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, दीपक सूर्यवंशी व विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते. उन्मेश पाटील यांच्यावर टीका करताना चव्हाण म्हणाले, मी स्वत: चाळीसगाव तालुक्यातील रहिवाशी आहे. एकेकाळी ते बसस्टॅडवर झाडू मारण्याचे काम करीत होते. त्यांना गिरीश महाजन यांनी आमदार, खासदार केले. नाव दिले, ताकद दिली. आज उमेदवारी नाकारताच महाजनांवर टीका करायला लागले. खरे तर त्यांनी संयम ठेवायला हवा होता. संयम ठेवणाऱ्यांना नक्कीच मोठी संधी मिळाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे आज पक्षाचे राज्याचे प्रमुख आहेत. स्मिता वाघ यांचे तिकीट कापून त्यांना उमेदवारी दिलीच होती, मग तेव्हा का नाही बोलले. ते जेथे केले, तेथे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.
प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविणार
भाजप स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिलपासून बुथ विजय अभियान राबविले जाणार आहे. यात पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जातील. पत्रके वाटप करण्यासह वाहनांना स्टीकर लावतील. मागील निवडणुकीत ज्या बुथवर जितके मतदान झाले होते, तेथे ३७० मतदान जास्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. अभियानात महिला, युवा यांच्या बुथनिहाय पाच समूह बैठका घेतल्या जाणार आहेत. दोन्ही मतदारसंघात उमेदवार पाच लाखापेक्षा जास्त मताधिक्यांनी विजयी होतील असा दावा अजित चव्हाण यांनी केला.