उन्हाळ्यात कुलरचा वापर करतांना काय काळजी घ्याल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 06:46 PM2018-04-07T18:46:58+5:302018-04-07T18:46:58+5:30
कुलरचा वापर करीत असताना त्यात विद्युत प्रवाह येऊन अपघात होण्याची शक्यता असते. तेव्हा कुलरचा गारवा अनुभवताना विद्युत सुरक्षेबाबत दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात वाढलेल्या तापमानापासून बचावासाठी घरोघरी कुलर लावण्यात येत असतात. कुलरचा वापर करीत असताना त्यात विद्युत प्रवाह येऊन अपघात होण्याची शक्यता असते. तेव्हा कुलरचा गारवा अनुभवताना विद्युत सुरक्षेबाबत दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.
लहान मुलांना खेळण्यास मज्जाव -
अनेकवेळा अपघाताच्या घटनांमध्ये कुलरच्या जवळपास खेळणाऱ्या लहान मुलांचा समावेश असतो. त्यामुळे कुलरच्या सान्निध्यात लहान मुले येणार नाहीत, अशा पध्दतीने कुलरची मांडणी करावी. कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असल्यास लहान मुलांचा हात पंख्यात जाणार नाही.
पाणी टाकतांना घ्या काळजी
कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीज पुरवठा बंद करावा. कुलरमधील वीजतारांचे (वायर्सचे) आवरण सुस्थितीत असल्याची खात्री करावी. कुलरमध्ये वीज तार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच, ओल्या हाताने कधीही कुलरला स्पर्श करु नये. कुलरमधून पाण्याची गळती होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
घरातील अर्थिंगची करा तपासणी -
घरातील अर्थिंग सुस्थितीत असल्याची तपासणी परवानाधारक ठेकेदाराकडूनच नियमित कालावधीत करावी. जुन्या वायरिंगची तपासणी करणे, खराब झालेली तसेच आवरणाची रोधक क्षमता कमी झालेली वायरींग तात्काळ बदलण्यात यावी.
अर्थिंगसाठी थ्री पिन प्लगचा करा वापर
कुलरला नेहमी थ्री पिन प्लग व सॉकेटचा वापर करावा. त्यामुळे कुलरला आर्थिंग व्यवस्थित मिळेल. विद्युतप्रवाहाची गळती झालेली असल्यास धोका टळेल. आय.एस.आय.चिन्ह आणि योग्य दजार्ची विद्युत उपकरणे वापरणे आवश्यक आहे.
व्यवसायिक व्यक्तिकडूनच करा दुरूस्ती
कुलरमध्ये कोणताही प्रकारचे बिघाड झाल्यास दुरूस्तीचे काम जबाबदार व्यवसायिक व्यक्तिकडून करून घ्यावे. कुलरच्या पंप दुरुस्ती करण्यापुर्वी वीज पुरवठा बंद करावा. पंपास वीज पुरवठा करणारी वीज तार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करावी.
विजेचा धक्का लागल्यास काय कराल
एखाद्यास विजेचा धक्का बसल्यास कोरड्या लाकडाने त्या व्यक्तीस स्पर्श न करता बाजुला करावे. त्वरित कृत्रीम श्वास देत रुग्णालयात आणा. घरातील विद्युत उपकरणे तात्काळ बंद करावी.
अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्सचा करा वापर
प्रत्येकाने आपल्या घरात अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवणे आवश्यक आहे. वीजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी तो तांत्रिकदृष्ट् या उत्तम उपाय आहे. त्यामुळे वीजेचा धक्का लागल्यास वीज प्रवाह खंडीत होऊन पुढील अनर्थ टळतात.
उन्हाळ्याच्या दिवसात कुलरचा वापर करीत असताना ग्राहकांनी विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून विद्युत अपघात टाळावे.
बी.के.जनवीर, मुख्य अभियंता, वीज वितरण कंपनी, जळगाव.