वसंतदादांशी गद्दारी करणा-यांना पक्षद्रोहा शिवाय दुसरं काय सुचणार? - चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2017 04:15 PM2017-02-08T16:15:12+5:302017-02-08T16:15:12+5:30
ज्यांच्या काकांनी स्व.वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसला त्यांना पक्षद्रोहा शिवाय काय सुचनार,असा घणाघाती आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर केला.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ८ - माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना पक्षासोबत द्रोह कधी मान्य नव्हता. ज्यांच्या काकांनी स्व.वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसला त्यांना पक्षद्रोहा शिवाय काय सुचणार? असा घणाघाती आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जळगावात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका खासगी वाहिनीवर बोलतांना स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यासह काही नेते काँग्रेसमध्ये जाणार होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नावाचे वलय पाहून जन्मतारखेत बदल केल्याचा गौप्यस्फोट केला होता, याबाबत विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील सांगितले की, अजित पवार यांना इतक्या वर्षानंतर या घटनेची आठवण कशी झाली. मुळात आता हे सर्वजण सैरभैर झाले आहेत. ज्यावेळी व्यक्ती सैरभैर होतो त्यावेळी तो अशा कथा तयार करतात. अजित पवार यांनी देखील अशीच कथा तयार केली आहे. ज्यांच्या काकांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसला, त्यांना द्रोहाशिवाय काय सुचनार, असा टोला त्यांनी लगावला. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत अजित पवाराचे वक्तव्य हास्यास्पद आहे. मुळात स्व.गोपीनाथ मुंडे इतके छोटे नेते नव्हते.आता सामान्य माणुस हुशार झाला आहे. त्यांच्यापुढे अजित पवारासारखे गोंधळून जातात. त्यामुळे ते काय बोलतात हेच समजत नाही.
हार्दिक पटेल आणा की अरविंद केजरीवाल आम्हाला फरक नाही
गुजराथमधील पाटीदार समाजाचे हार्दिक पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबाबत विचारले असता, मुंबई महापालिकेत शिवसेनेला फटका बसणार आहे. त्यामुळे ते हादरले आहेत. हार्दिक पटेल यांना शिवसेनेत प्रवेश देऊन ते खेळी करीत आहेत. शिवसेनेने हार्दिक पटेल यांना आणावे नाही तर अरविंद केजरीवाल यांना आम्हाला विशेष फरक पडणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सेनेचे मतदभेद दूर करण्यासाठी मी आहे, सर्व बरोबर करेन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता सेना व भाजपा हे एका विचाराचे पक्ष आहेत. काळाच्या ओघात दोघांच्या वेगवेगळ्या चुली झाल्या. सेना व भाजपामधील भांडण हे कुटुंबातील आहे. सेना व भाजपात मतभेदच आहेत, मनभेद नाही. आणि झालेले मतभेद दूर करण्यासाठी मी आहे, सर्व ठीक करेन असे त्यांनी सांगितले.