वापरलेल्या मास्कचे काय केले जाते रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:14 AM2021-04-14T04:14:38+5:302021-04-14T04:14:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच जात आहे. अनेक खासगी रुग्णालयांमध्येदेखील आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच जात आहे. अनेक खासगी रुग्णालयांमध्येदेखील आता कोरोना रुग्णांसाठी बेडदेखील शिल्लक नाहीत. त्यात अनेक रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत तर कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर महापालिकेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, या ठिकाणी असलेल्या रुग्णांनी वापरलेल्या मास्क व इतर साहित्याचा कचरा व शहरात जमा होणारा इतर कचरा एकाच ठिकाणी जमा होत असून, यासाठी महापालिकेकडे कोणतीही वेगळी यंत्रणा उपलब्ध करण्यात आलेली नाही.
खासगी व सरकारी रुग्णालयात जमा होणाऱ्या कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने एका खासगी संस्थेला ठेका दिलेला आहे. मात्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील कचरा गोळा करण्याचे काम वॉटरग्रेस कंपनीकडूनच सुरू आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांसह महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांनादेखील कोरोना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरातील एमआयडीसी भागात वापरण्यात आलेल्या मास्कचा वापर गादी बनवण्यासाठी होत असल्याचा प्रकार जळगाव शहरात रविवारी उघडकीस आला होता. यामुळे जळगाव शहरासह जिल्हाभरात कोरोना सेंटरमधील रुग्णांच्या वापरण्यात आलेल्या मास्क व इतर साहित्याबाबत जिल्हा प्रशासनाने वेगळी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. मात्र जळगाव शहरात महापालिकेकडूनच शहरातील इतर कचरा प्रमाणेच हा कचरा उचलला जात असल्याने धोका निर्माण झाला आहे.
अशी लावली जाते कचऱ्याची विल्हेवाट
कोविड-१९मुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट ही विशिष्ट पद्धतीने लावली जाते. सध्या कोविड-१९चा कचरा जमा करण्याचे काम हे माॅन्साई बायोमेडिकल वेस्ट या कंपनीकडे आहे. या कंपनीकडे ड्युअल चेंबर इन्सिनिरेटर नावाची यंत्रणा आहे. त्यामध्ये हा कचरा टाकला जातो. हा कचरा दोन चेंबरमधून जाताना वेगवेगळ्या तापमानातून जातो. पहिल्या चेंबरमध्ये या कचऱ्याच्या बऱ्यापैकी कार्बन केला जातो. त्यानंतर हा सर्व कचरा दुसऱ्या चेंबरमध्ये पाठवला जातो. काही प्रमाणात संयुगे जळालेल्या स्थितीत हा कचरा दुसऱ्या चेंबरमध्ये अतिशय जास्त तापमानाखाली ठेवला जातो. ज्या ठिकाणी या संपूर्ण कचऱ्याची राख होते.
पीपीई किटपेक्षाही वापरल्या गेलेल्या मास्कमुळे अधिक धोका
कोविड रुग्णालयात पीपीई किट घातल्यानंतर ते लगेचच कचऱ्याच्या डब्यात टाकले जाते. मात्र, या टाकाऊ पीपीई किटपेक्षाही रुग्णालयातून वाया गेलेले अन्न, रक्ताचे घेतलेले स्वॅब, वापरलेले मास्क यामधून संसर्ग होण्याचा धोका हा अधिक मानला जातो. त्यामुळे वापरल्या गेलेल्या मास्कचे विघटन हे योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. जळगाव शहरात खासगी व सरकारी रुग्णालयासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून मास्कचे संकलन करून त्याचे योग्य पद्धतीने विघटन होत असले तरी महापालिकेकडून वापरण्यात आलेले मास्क हे घनकचरा प्रकल्पात टाकले जात आहेत. तसेच अनेक खासगी व सरकारी रुग्णालयाच्या बाहेरदेखील जैविक कचरा मोठ्या प्रमाणावर जमा झालेला असतानाही संबंधित ठेकेदारासह महापालिकेचेदेखील याकडे दुर्लक्ष आहे.
- शहरात जमा होणारा एकूण कचरा - २३० टन
- ओला कचरा - १०० टन
- सुका कचरा - १३० टन
कोट..
जळगाव शहरात वापरलेल्या मास्कचा वापर करून गादी तयार करण्यात आलेली घटना ही जरी शहरात असली तरी वापरण्यात आलेले मास्क हे बाहेरगावाहून हेच आलेले होते. तसेच जळगाव शहरातील कोरोना सेंटरमधील कचरा महापालिकेकडूनच जमा केला जातो एका स्वतंत्र वाहनाचीदेखील व्यवस्था करण्यात आलेली. तर शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये जमा होणाऱ्या जैविक कचरा व्यवस्थापन एका खासगी ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. महापालिकेचे जैविक कचऱ्याच्या विघटनासंदर्भात योग्य धोरण असून या संदर्भात कुठलेही दुर्लक्ष केले जात नाही.
- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, महापालिका