- काय आहे मूर्तीचे वैशिष्ट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:33 AM2021-09-02T04:33:35+5:302021-09-02T04:33:35+5:30
तुरटीची गणेशमूर्ती पूर्वीच्या काळी घराघरात तुरटीचे खडे राहायचे. हे खडे माठात फिरविले जायचे. पाणी शुध्द करण्याची हीच संकल्पना घेऊन ...
तुरटीची गणेशमूर्ती
पूर्वीच्या काळी घराघरात तुरटीचे खडे राहायचे. हे खडे माठात फिरविले जायचे. पाणी शुध्द करण्याची हीच संकल्पना घेऊन बाप्पाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. तुरटीमुळे गणेशमूर्तीचे पावित्र्य तर जपले जाईल, त्याचबरोबर मूर्ती पाण्यात विरघळणार असल्याने विसर्जनानंतर मूर्तीची विटंबनाही होणार नाही. तर नदीत विसर्जन केले तर नदीचे पाणीही शुध्द होण्यास मदत होईल. तसेच गाळ खाली बसविण्यास मदत होईल. आठ, दहा आणि बारा इंचापर्यंत मूर्ती बाजारात उपलब्ध करून पाचशे रुपयांपासून मूर्ती उपलब्ध असल्याची माहिती मूर्तीविक्रेत्या ममता काबरा यांनी दिली.
लाल मातीची मूर्ती
लाल मातीची गणेशमूर्ती ही शाडू मातीपेक्षा अधिक टिकाऊ असते. तसेच ती पाण्यातही पटकन विरघळते. हे लाल मातीच्या गणेशमूर्तीची वैशिष्ट्ये आहेत. बाजारात ती अडीचशे रुपयांपासून उपलब्ध असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. तर आपले पूर्वज आधी लाल मातीपासूनच गणेशमूर्ती साकारत असल्याचे विक्रेते भरत दुबे यांनी सांगितले.
शाडू मातीची मूर्ती
शाडू माती विघटनशील आहे. गणेशमूर्ती बादलीत विसर्जन केली तर अवघ्या एक-दीड तासात ती विरघळते. तिचे पाण्यात लगेचच वहन होते. तसे पीओपीचे होत नाही, त्यामुळेच विसर्जनानंतर नदीकाठी किंवा समुद्रतीरावर मूर्तीचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. शाडू मातीची मूर्तीही बाजारात चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे.
गोमातेच्या शेणापासूनची मूर्ती
निसर्गाला हानी पोहोचू नये, तसेच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी गोमय गणेशमूर्ती ही संकल्पना रुजू लागली आहे. गोमातेच्या शेणापासून तयार मूर्ती बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. ही मूर्ती वजनाने हलकी असते. शेण हे मातीला पूरक असते व ते मातीची क्षमताही वाढविते. वनस्पती वाढीसाठी आवश्यक घटकही त्यात असतात. त्याशिवाय शेणाची मूर्ती ही पाण्यात लवकर विरघळते. त्याचा खत म्हणूनही उपयोग होऊ शकतो. बाजारात एक ते दोन फुटांपर्यंत मूर्ती उपलब्ध आहेत. पाचशे ते हजार रुपयांपर्यंत या मूर्ती उपलब्ध आहेत.
गणेश मंडळांच्या बैठका
शहरातील गणेश मंडळांच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत. बैठकांमधून मंडळाचे अभिप्राय मागविले जात आहेत. तर सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. तसेच विविध गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सार्वजनिक गणेश महामंडळांकडून संपर्क साधून मार्गदर्शनसुध्दा केले जात आहे.
- सचिन नारळे, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ
जिल्ह्यातील गणेश मंडळे : २,०००
शहरातील गणेश मंडळे : ६९०