‘पायाभूत’चे ‘भूत’ आॅगस्टमध्ये कशासाठी?, अभ्यासकांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:49 PM2018-08-28T12:49:09+5:302018-08-28T12:49:48+5:30
मंगळवारपासून परीक्षा
विलास बारी
जळगाव : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत २८ ते ३१ आॅगस्ट दरम्यान इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी होत आहे. जून महिन्यात होणारी ही चाचणी यावेळी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे शासनाचे प्रयोजन काय? असा सवाल अभ्यासकांकडून उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे तर्फे गेल्या तीन वर्षांपासून इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी परीक्षा घेतली जात आहे.
क्षमता समजण्यासाठी चाचणी
पायाभूत चाचणी ही मागील वर्गांच्या मुलभूत क्षमतांवर आधारित असते. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात यावी. तसेच त्यांच्यातील प्रगत व अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या किती आहे. विद्यार्थ्यांना मराठी, गणित, इंग्रजी हे विषय शिकविले जावे हा उद्देश आहे. सुरुवातीला जून महिन्याच्या अखेर ही चाचणी घेण्यात येत होती. मात्र यावर्षी ही चाचणी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होत आहे.
चाचणीच्या निकालाबाबत साशंकता
प्रायोगिक तत्वावर प्रथम भाषा व गणित या दोन विषयांच्या वर्षभरात तीन शैक्षणिक प्रगत चाचण्या घेण्याचे २२ जून रोजी काढलेल्या शासन निर्णयात नमूद केले होते. त्यानुसार २०१६/१७ मध्ये २८ व २९ जुलै दरम्यान घेतली होती. आता जून ऐवजी पहिल्यांदाच ही चाचणी आॅगस्टमध्ये घेण्यात येत आहे. हे होत असताना या चाचणीच्या निकालाचे कोणतेही विश्लेषण मात्र होत नाही. तसेच अप्रगत विद्यार्थ्यांना ‘प्रगत’ करण्यासाठी शाळांनी कोणते उपाय केले याबाबतची माहित समोर येत नाही, असे शिक्षणक्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.
वाचता न येणारे विद्यार्थी प्रश्न कसे सोडविणार?
पायाभूत चाचणीच्या दर्जाबाबतदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सेमी इंग्रजीमध्ये प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी या विषयाचे प्रश्न वाचता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका सोडविणे अवघड होत आहे. त्यात या विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न मराठी भाषेतून समजावून सांगत सोडवून दाखावे लागतात. ‘चित्र पहा, त्यावर गोष्ट लिहा’ या प्रश्नासाठी ५ गुण देण्यात आलेले असतात. मात्र इयत्ता २ री ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना चित्रवाचन जमत नसल्याने अनेक शाळांकडून तयार उत्तर विद्यार्थ्यांना द्यावे लागत असते.
अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक संपल्यानंतर वर्गातल्या वर्गात १० गुणांची परीक्षा घटक चाचणी स्वरुपात घेतली जाते. आज तो अर्थ पूर्णपणे विसरत शिक्षण विभाग पायाभूत चाचणी घेत आहे. ही बाब चिंताजनक आहे.
-चंद्रकांत भंडारी, शिक्षणतज्ज्ञ