नियम केले म्हणून काय झालं..आम्ही रस्त्यावर, गल्लीत मधुशाळा भरवू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:19+5:302021-07-16T04:13:19+5:30
सुनील पाटील जळगाव : शासन कोरोनाच्या नावाने नियम करीत असले तरी मद्यपींना त्या नियमांशी घेणं-देणं नाही. त्यांनी नियम करावे, ...
सुनील पाटील
जळगाव : शासन कोरोनाच्या नावाने नियम करीत असले तरी मद्यपींना त्या नियमांशी घेणं-देणं नाही. त्यांनी नियम करावे, आम्ही हॉटेलमध्ये नाही तर रस्त्यावर बसून मद्यप्राशन करू, असाच जणू मद्यपींनी निर्धार केल्याचे दिसून येत आहे. शहरात प्रत्येक दारु दुकानाच्या परिसरात मद्यपी हातगाड्यांवर तर कधी गल्लीत खाली बसून बिनधास्त मद्यपान करीत आहेत. तर्रर झालेले काही जण तर रस्त्याने जाणाऱ्या महिला व मुलींना पाहून शेरेबाजी, इशारे करीत असल्याचेही प्रकर्षाने जाणवले. ‘लोकमत’ ने शहरातील काही दारु दुकान व हॉटेल परिसरात जाऊन पाहणी केली असता हे धक्कादायक दृष्य नजरेस पडले.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी नियमावली लागू होत असताना मद्यपी व मद्यविक्रेत्यांकडून त्याला वेळोवेळी तिलांजली देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. त्याचा परिणाम शिवाजी नगर, गेंदालाल मिल या भागात खुनाची घटना घडली. इतकेच काय गेल्याच आठवड्यात हिराशिवा कॉलनीत पाण्याच्या टाकीखाली बसून गुन्हेगारांची मधुशाळा सुरू होती, त्यातून खुनाची घटना घडली. अशा घटनांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलीस दलाचेही काम वाढले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी ना पोलिसांकडून प्रयत्न होतात, ना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून. राज्य उत्पादन शुल्क विभागाला तर महसुलाशीच घेणं-देणं आहे. कोणी नियम तुडवून मद्याची विक्री केली काय आणि तस्करी केली काय. गल्लोगल्ली असो किंवा रस्त्यावर मद्यपींनी अड्डा भरविला तरीदेखील त्याचे सोयरसुतक या विभागाला नाही.
लोकमत प्रतिनिधीने काय अनुभवले...
प्रसंग १
मद्यपींना बघून महिलेने बदलविला रस्ता
चित्रा चौक परिसरात बुधवारी सायंकाळी पाच वाजता जुने बसस्थानकाला लागून मागील बाजूस दोन ठिकाणी काही मद्यपींनी अड्डा थाटला होता. पोलन पेठ जुन्या बसस्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यावर बसस्थानकाच्या भिंतीला लागून दोन जण मद्यप्राशन करीत होते. त्यानंतर लॉटरी तिकीट विक्रीच्या गल्लीत तर चार ते पाच जण तर्रर होते. काही जण उभे राहून तर काही जण बसून मद्याचे घोट रिचवत होते. या दोन्ही ठिकाणाहून लोकांचा वावर सुरू होता. मद्यपींना पाहून महिलांनी रस्ता बदलवून घेतला होता.
प्रसंग २
महिलेला बघून शेरेबाजी
पोलन पेठेत दाणा बाजाराकडून कोंबडी बाजाराकडे येणाऱ्या रस्त्यावर हातगाडीवर काही मद्यपींची शाळा भरली होती तर त्याला लागूनच गल्लीतही काही जण मद्याचे घोट रिचवत मोबाइलवर गाणे वाजवत होते. बाजाराकडून चालत येणाऱ्या एका महिलेकडे पाहून मद्यपीने शेरेबाजी केली. त्याचा हा आवाज महिलेला ऐकू आला; मात्र मद्यपीशी बोलण्यात अर्थ नाही म्हणून ही महिला सरळ निघून गेली. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेकडे पाहूनदेखील या मद्यपींनी आपसात कमेंटस् केल्या.
प्रसंग ३..
भररस्त्यावर मद्यविक्रीचा फलक
भजे गल्लीत तर नेहमीचीच जत्रा असते. या भागात हातगाड्यांवरच बसून मद्यपी मद्यप्राशन करतात. अगदी बसस्थानकाच्या कोपऱ्यापासून तर थेट शेवटच्या टोकापर्यंत हातगाड्या, रिक्षा व चारचाकीत बसूनही काही जण मद्यप्राशन करीत होते. एका हॉटेल चालकाने तर वाईनशॉपच्या दरात दारु मिळेल, असा फलकच भररस्त्यावर लावला आहे.
प्रसंग ४
इच्छा देवी चौकात दहशत
इच्छा देवी चौकात दारु दुकानाच्या समोरच मोकळ्या जागेत तसेच तेथे लागणाऱ्या वाहनात बरेच जण दोन-तीनच्या जोडीने मद्यप्राशन करीत होते. समोरच पोलीस चौकी आहे; मात्र त्याचा उपयोग नाही. दारु दुकान दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. चौकातून पाचोरा, चाळीसगाव व शिरसोली, म्हसावद या भागाकडे खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहने वापरतात, शिवाय बसचाही थांबा आहे. त्यामुळे प्रवासी थांबलेले असतात. या भागात काही मद्यपींची प्रचंड दहशत आहे, हा प्रकार थांबला पाहिजे, असे एका प्रवाशाने सांगितले.
काय आहेत प्रशासनाचे आदेश
पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे अनलॉक झाले. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पहिल्या टप्प्यात अनलॉक झाला. या निकषात जळगाव जिल्हा येत असल्याने ७ जूनपासून जळगाव जिल्हा अनलॉक झाला आहे. यात संस्था व दुकाने यांचा नियमित व्यवहार सुरू करतानाच सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेचे बंधन निश्चित करण्यात आले आहे. मद्यविक्रेत्यांना चार वाजेनंतर पार्सल देण्याचा अधिकार आहे. हॉटेलमध्ये बसू शकत नाहीत, त्यामुळे मद्यपी रस्त्यावर व जागा मिळेल तेथे बैठक मारतात.