जे पेरलं, तेच उगवलं, खडसेंनी बाभळीच्या झाडाकडून आंब्याची अपेक्षा करू नये - गिरीश महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 03:18 PM2022-11-17T15:18:12+5:302022-11-17T15:19:02+5:30
खडसेंनी आता आरोप करण्यापेक्षा चौकशीला सामोरे जावे, कारण खडसेंनी जे पेरलं आता तेच उगवत असून, खडसेंनी आता चौकशी यंत्रणांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले.
जळगाव : अनेक गैरप्रकारांमध्ये एकनाथ खडसेंची चौकशी सुरू झाली असल्याने, त्यांच्याकडून खोटे आरोप करण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्याही यंत्रणेवर कोणताही दबाव नसून, खडसेंनी ‘जे पेरलं, तेच आता उगवत आहे, त्यामुळे खडसेंनी बाभळीच्या झाडाकडून आंब्याची अपेक्षा करू नये अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजपचा हेतू शुद्ध नसल्याचा आरोप खडसेंनी केला होता. याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता, कोणाचा हेतू काय ? हे सर्व जनतेला माहिती असल्याचे सांगितले. जर त्यांचा हेतू चांगला राहिला असता, तर सर्वच संस्थांवर परिवाराला पुढे केले नसते. जिल्हा बँकेत खडसे, दूध संघात खडसे, आमदारकीला खडसे अशा सर्वच ठिकाणी जर हेतू चांगला राहिला असता तर परिवाराला त्यांनी पुढे केले नसते असेही महाजनांनी सांगितले. आम्ही कोणत्याही यंत्रणेवर दबाव टाकत नसून, खडसेंनीच हे राजकारण केले. प्रवीण चव्हाणच्या पेनड्राईव्ह प्रकरणात हे समोरच आले असल्याचे महाजनांनी सांगितले.
खडसेंनी सुडाचे राजकारण जिल्ह्यात सुरू केले. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना अडकवले, मनपातील नगरसेवकांना अडकवले. आता स्वत:ची चौकशी सुरू झाली म्हणून, त्यांना शासकीय यंत्रणाचा दबाव दिसू लागला. खडसेंनी आता आरोप करण्यापेक्षा चौकशीला सामोरे जावे, कारण खडसेंनी जे पेरलं आता तेच उगवत असून, खडसेंनी आता चौकशी यंत्रणांना चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले.