नवविधा काय बोलिली जी भक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:26 PM2018-11-21T13:26:03+5:302018-11-21T13:26:39+5:30
परमेश्वराचे श्रवण किर्तन सेवा
भक्तिचे दुसरेनाव म्हणजे उपासना ! भक्तिे ही सर्वाधिकार सेव्य आहे. नवविधा म्हणजे एकूण भक्तीचे नऊ प्रकार आहेत.
श्रवणं किर्तनं विष्णे । स्मरण पाद सेवन् ।
अर्चनं वंदनं दास्य सख्यमात्म निवेदनम् ।।
परमेश्वराचे श्रवण किर्तन सेवा, स्मरण, पूजा, वंदन दास्य, सख्य आणि आत्मभावाने आत्म निवेदन’ अशी ९ प्रकारची भक्ती आहे.
भक्ताची व्याख्या विभक्त नव्हे तो भक्त अशी केली जाते. भक्त स्वत:ला भगवंताचा दास मानतो. अशी ही अपरा नावाची भक्ती आहे.
पराभक्ती ही सर्वांहून श्रेष्ठ आहे. पराभक्ती हेच भक्ती मार्गाचे श्रेष्ठत्वाचे स्थान आहे. भक्ताला साकारातून निराकारात जावयाचे असते. सगुणातून निर्गुणात द्वैतातून अद्वैतात. शुभारंभ होतो तो आकारात आणि इतिश्री निर्गुणत आणि निराकारात आधी द्वैत मग अद्वैत भक्तीची सुरुवात साकार सगुण भगवंतापासून आणि शेवट निर्गुण निराकार परमात्मा मध्ये होतो. म्हणून भक्त सगुणाच्या आधाराने निर्गुण स्वरूपात आपले मन स्थिर करू शकतो. परम प्रेमाच्या रस्त्याची सुरुवात एकातून नव्हे तर दोनातून होतो. पण शेवट दोघांमध्ये होतो. उपासनेनेच अंतिम अद्वतात जाता येते. उपासना भक्ती भक्ताला हळूहळू भगवंतांशी एक करत जाते.
अद्वैताचा अनुभव हेच भक्ती योगाचे शेवटचे तत्त्व आहे. भक्ताचे भगवंत स्वरूपात विलीन होणे हेच उपासनामार्गाचे ध्येय असायला हवे. तिच खरी पराभक्ती होय. म्हणूण भगवान सांगतात की अनन्य भक्तीने तो भक्त जो आणि जसा परमात्मा आहे तसा त्याला जाणतो. त्याला अनुभवतो त्याच्यातच प्रवेश करतो, त्याच्याशीच एक होतो. परमात्माच होतो. ब्रह्म ज्ञानाची अनुभूती त्या भक्ताला येते. मग गोपींच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास
लाला देखन मैं गयी । मे भी भयगई लाला ।।
संतांच्या भाषेत हीच गोष्ट सांगावयाची झाल्यास
देव पहावयासी गेलो । देवच होवोनिया ढेलो ।।
हिंदी कवींच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास
ढुंडा सकल जहाँ मे तब पता तेरा नही ।
और जब पता तेरा लगा तो अब पता मेरा नही ।।
तर ही किमया नवविधा भक्तीमध्ये आहे व नवविधा भक्ती ही संत कृपेशिवाय प्राप्त होत नाही म्हणून संतांजवळ मागावयाचे आहे की,
नवविधा काय बोलिली जी भक्ती ।
द्यावी मज हाती संत जनी ।।
-दादा महाराज जोशी, जळगाव