कशाला हवे 'ते' अंतर्गत गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:17 PM2019-07-10T12:17:57+5:302019-07-10T12:18:28+5:30
गेल्या शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी जे भाषा, समाजशास्त्र या विषयांसाठी अंतर्गत गुण (वीस) दिले जात होते ते बंद झाले़
गेल्या शैक्षणिक वर्षापासून दहावीसाठी जे भाषा, समाजशास्त्र या विषयांसाठी अंतर्गत गुण (वीस) दिले जात होते ते बंद झाले़ फक्त गणित, विज्ञानासाठी ते दिले जातात़ पण जेव्हा दहावीचा निकाल लागला आणि इतर परीक्षा मंडळापेक्षा एसएससी बोर्डाचा निकाल कमी लागलेला दिसला़ तेव्हा खरी आरडाओरड सुरू झाली आणि गुणवत्ता हा विषय गृहीत धरला तरी अंतर्गत गुण बंद करणे म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धेपासून दूर ठेवण्यासारखे आहे, असे मत मांडले गेले़ आता सहामाहिचे वा पुर्व परीक्षांचे पेपर हे ८० गुणांचे काढायचे की शंभर गुणांचे? हेही विचारले गेले़ जुलै अखेरपर्यंत यावर ठोस निर्णय घ्यावा, असेही शालेय शिक्षणमंत्र्यांना सुचविले गेले. अंतर्गत गुणासंबधी जी चर्चा होते तशी गुणवत्ता यादी हवी कशाला? यासंबंधीही चर्चा झाली होती़ गुणवत्ता यादीमागचे नेमके प्रयोजन कोणते ? व ती ज्या पद्धतीने तयार केली जाते त्यात अपेक्षित उद्देश साध्य होतो का? यावरही चर्चा होते ती गुणवत्ता यादी बाद ठरवली गेली़ आज नेमकी हीच, म्हणजे 'गुणवत्तेचा फुगवटा' 'फुकटाचे वीस गुण' हे विषय समोर येत अंतर्गत गुणांची 'सोय' बंद करण्यात आलीय, जी गोष्ट कुणावरती अन्याय करणारी वा स्पर्धेतून बाहेर काढणारी नाही, उरला प्रश्न प्रश्नपत्रिका ८० कि १०० गुणांची ? जर अंतर्गत गुणबंदच केलेय तर प्रश्नपत्रिका शंभर गुणांचीच सोडवावी लागेल़ भाषा, समाजशास्त्र या विषयांची अंतर्गत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्याने एसएससीच्या विद्यार्थ्यांना अन्य बोर्डाच्या तुलनेत दहावीला कमी गुण मिळतील ही जी भिती निर्माण केली जाते त्यांनी दोन तीन वर्षातील निकाल व अकरावी प्रवेशासंबधीचा खोलवर अभ्यास करावा. - चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक, केसीई सोसायटी.