अशा चोरांना म्हणावं तरी काय... चैनीसाठी करायचा महागड्या सायकलींची चोरी!
By सागर दुबे | Published: April 26, 2023 08:28 PM2023-04-26T20:28:48+5:302023-04-26T20:29:45+5:30
सायकल चोर फसला पोलिसांच्या जाळ्यात; तब्बल ३१ सायकली हस्तगत
सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शहरातील क्लासेस, अभ्यासिकांच्या बाहेरून महागड्या सायकली चोरणाऱ्या चोरट्याला रामानंदनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून तब्बल ३१ सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. जयेश अशोक राजपूत (१९, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा) असे चोरट्याचे नाव आहे. केवळ चैनीसाठी या चोऱ्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्याच्याकडून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
संताजी नगर येथील गिरिष खैरकर या विद्यार्थ्यांची शिवकॉलनीतील एकलव्य स्टडी पॉईंटच्या बाहेरून सायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सुशिल चौधरी हे करीत असताना त्यांना पिंप्राळा येथील जयेश राजपूत हा चोरीच्या सायकली कमी किंमतीमध्ये विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलिसांचे पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर पिंप्राळा येथून राजपूत याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देवून पोलिसांनी तब्बल ३१ सायकली काढून दिल्या.
अभ्यासिका, क्लासेसटार्गेट
सायकल चोरटा जयेश हा शिवकॉलनी, गणपतीनगर, आदर्श नगर, रामानंदनगर परिसरातील अभ्यासिका आणि क्लासेस बाहेर उभ्यास असलेले आणि कंपाउंडमध्ये लावलेल्या सायकली चोरत होता. त्या चोरल्यानंतर त्यांची ५०० ते हजार रूपये किंमतीमध्ये विक्री करीत होत्या. ज्यांना सायकली विक्री केल्या त्यांच्याकडून सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
मौजमजेसाठीसायकलींचीचोरी
केवळ मौजमजेसाठी सायकलींची चोरी करीत असल्याची कबुली जयेश याने पोलिसांना दिली आहे. त्याच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलिसांची चौकशी सुरू आहे.
यांनीकेलीकारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित व पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सपकाळे, विजय खैरे, सुशिल चौधरी, रेवानंद साळूंखे, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, अतुल चौधरी, उमेश पवार, ईश्वर पाटील, अनिल सोननी, दीपक वंजारी आदींनी केली आहे.