जळगावातील ६० टक्के एस.टी.कर्मचाऱ्यांचे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 10:29 AM2022-04-11T10:29:22+5:302022-04-11T10:29:55+5:30
ST employees : एसटी महामंडळाने संपातील कर्मचाऱ्यांवर सुरुवातीला निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे.
- सचिन देव
जळगाव : न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले असले तरी कर्मचार्यांच्या हितासाठी लढणारे ॲड.सदावर्ते नेमकी काय भूमिका घेतात यावर कामावर हजर होण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती संपकरी एस.टी.कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कामावर रूजू होण्यासाठी २२ एप्रिल ही शेवटची डेडलाईन असून, विचार करण्यासाठी भरपूर वेळ असल्याचेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
राज्य शासनात विलिनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या पाच महिन्यांपासून संप सुरु आहे. मात्र, अद्यापही विलिनीकरणाची मागणी मान्य झालेली नसल्यामुळे कामगार आपल्या मागणीवर ठाम आहेत. मात्र, शासनाने विलिनीकरण शक्य नसल्याचे सांगून, न्यायालयाने यावर सर्व एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याची मुदत दिली आहे. परंतु, अद्यापही अनेक कर्मचारी कामावर रूजू झालेले नाहीत. ॲड. गुणरत्न सदावर्ते हे विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरुवातीपासून न्यायालयात लढा देत आहेत. त्यामुळे ते जे सांगतील, त्यानुसार कामावर येण्याबाबत निर्णय घेणार असल्याची भूमिका जळगाव आगारातील संपकऱ्यांनी मांडली आहे.
आतापर्यंत ७०० कर्मचाऱ्यांवर कारवाई
एसटी महामंडळाने संपातील कर्मचाऱ्यांवर सुरुवातीला निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत ४५५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तर २२९ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाच्या सूचनेनुसार ही कारवाई मागेही घेण्यात येत आहे.
६० टक्के कर्मचारी अद्यापही संपात
- महामंडळाने आणि आता न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे वेळोवेळी आवाहन केल्यानंतर सद्यस्थितीत ४० टक्के कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत.
- अद्यापही विलिनीकरणाच्या निर्णयाबद्दल ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिकेवर विश्वास ठेवून ६० टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत.