व्हॉटस्अॅपमुळे लागला बेवारस बाळाचा तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:26 AM2019-10-24T00:26:20+5:302019-10-24T00:28:05+5:30
वडगाव खुर्द येथे पहाटे पाच वाजता गोंडस बाळ बेवारस स्थितीत शेतकºयास आढळले. बाळाचा फोटो व माहिती व्हॉटस्अॅपवर व्हायरल केल्याने बाळाचा तपास लगेच लागला.
संजय सोनार
नगरदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या वडगाव खुर्द येथे दि.२४ च्या पहाटे वडगाव ते नगदेवळा पानद रस्त्यावर पहाटे पाच वाजता एक ते दीड वर्षाचे गोंडस बाळ वडगावपासून एक कि.मी.अंतरावर बेवारस स्थितीत शेतकºयास आढळले. बाळाचा फोटो व माहिती व्हॉटस्अॅपवर व्हायरल केल्याने बाळाचा तपास लगेच लागला. सदर बाळ हे सुभाष पावरा या अतुल काळे महाराज यांच्या सालदाराचे होते.
अतिशय सुंदर, गोरेपान बालक मध्य रात्री सुभाषच्या शेतातील झोपडीतून उठून दिशाभूल होत तब्बल तीन कि.मी. अंतरापर्यत पोहचलेले होते. रात्रभर मुसळधार पाऊस, चिखल व वारेमाप वाढलेल्या गवतातून बाळ सुरक्षित राहिले याचेच अप्रूप व भीतीसह वडगावकर घटनास्थळी धावले व पोलीस पाटील संजय मानसिंग पाटील व सहकारी त्याला घेऊन सकाळी साडेआठ वाजता नगरदेवळा औट पोस्टला जमा केले.
व्हॉटस्अॅपवरील फोटो व माहितीमुळे शेतकरी अतुल काळे यांनीही सालदाराच्या बाळास ओळखून पोलीस स्टेशन गाठले व शेतशिवारात तपास करत फिरणाºया बाळाच्या वडिलास बोलावून बाळ त्याच्या स्वाधीन केले.