विटनेर शिवारातून गहू, दादर लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:14 AM2021-03-22T04:14:34+5:302021-03-22T04:14:34+5:30
गोदामाचे शटर तोडले : सलग तिसरी घटना लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील विटनेर शिवारात शिवचरण नथ्थूसिंग परदेशी (५५) ...
गोदामाचे शटर तोडले : सलग तिसरी घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील विटनेर शिवारात शिवचरण नथ्थूसिंग परदेशी (५५) यांच्या शेतातील गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रत्येकी १ क्विंटलची दादरची १२ पोती, गव्हाची प्रत्येकी एक क्विंटलची १० पोती, १० हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही, फवारणी पंप व मोबाईल असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.
शिवचरण परदेशी यांचे जळके-विटनेर रस्त्यावर गट क्र. ४९९ ब-२ हे शेत असून, तेथे गोदाम बांधलेले आहे. शेतातील काढलेला गहू व दादर त्यांनी पोत्यात भरुन गोदामात ठेवला होता. १८ मार्चच्या रात्री चोरट्यांनी गोदामाच्या शटरचे कुलूप तोडूप आतील सर्व साहित्य चोरुन नेले. यासाठी चोरट्यांनी शेतात ट्रॅक्टर किंवा अन्य मोठे चारचाकी मालवाहू वाहन आणले असावे, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, परदेशी यांच्या याच शेतातून याआधीही तीनवेळा धान्य व इतर साहित्यांची चोरी झाली आहे. त्यांच्यात शेतात सातत्याने चोरी होत आहे. त्याशिवाय जळके व वसंतवाडी येथेही गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या ठिबक नळ्या लांबविण्यात आल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात आधी चोरी झाली, त्याच शेतकऱ्यांकडे दरवर्षी चोरी होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील पाटील करत आहेत.