जळगावच्या बाजारपेठेत महिनाभरानंतर गव्हाचे भाव कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:54 PM2019-05-30T12:54:53+5:302019-05-30T12:55:22+5:30
विजयकुमार सैतवाल, जळगाव जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी असलेली गर्दी काहीसी कमी झाली असून महिनाभरानंतर गव्हाचे भाव कमी झाले ...
विजयकुमार सैतवाल, जळगाव
जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी असलेली गर्दी काहीसी कमी झाली असून महिनाभरानंतर गव्हाचे भाव कमी झाले आहे. वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी सुरू होती, तेदेखील थांबली आहे. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून सुरुवातीपासूनच त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात गेल्या महिनाभरापासून गहू व डाळीमध्ये दर आठवड्याला तेजी येत असल्याने ग्राहकांची चिंता वाढली होती. तीन आठवड्यांपूर्वी वाढलेल्या तांदळाचे भावदेखील गेल्या आठवड्यापासून स्थित आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊन कडधान्याची आवक कमी असल्याने डाळीवर परिणाम झाला व सुरुवातीपासूनच डाळींचे भाव वाढू लागले. त्यात कडधान्याच्या आयातीच्या प्रमाणावर निर्बंध येण्यासह मागणी वाढल्याने गेल्या महिनाभरापासून धान्य, डाळींचे भाव वाढत होते. मात्र आता मागणी कमी झाल्याने गव्हाचे भावदेखील कमी होत असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.
गेल्या आठवड्यात ८४०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात देखील याच भावावर स्थिर आहे. उडीदाच्या डाळीच्या भावात घसरण होऊन ६२०० ते ७००० रुपये प्रती क्विंटलवरून ६४०० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ६१०० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६१०० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर तर तसेच तूरडाळीच्या भावातदेखील २०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने घसरण होऊन ते ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटलवरून ८७०० ते ९००० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.
गव्हातही घरसण
वर्षभरासाठी धान्य खरेदी काहीसी कमी झाल्याने गव्हाच्या भावत ५० रुपये प्रती क्विंटलने घसरण झाली आहे. २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव २२५० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवरून २२५० ते २३५० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसीचे भाव ३७५० ते ३९५० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २३५० ते २४५० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे.
तांदुळाचे भाव स्थिर
तांदुळाची आवक नसल्याने व मागणी कायम असल्याने गेल्या तीन आठवड्यापासून तांदळाच्या भावातही वाढ झाली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून हे भाव स्थिर आहे. यात चिनोर ३२०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४२०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४८०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २७०० ते २८०० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती ९००० ते १ हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.