गव्हाच्या भावात ३०० ते ४०० रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:53 AM2020-01-13T11:53:40+5:302020-01-13T11:54:01+5:30
‘एफसीआय’ने भाव वाढविल्याचा परिणाम : पावसाळा व हंगामही लांबणार असल्याने दरवाढीत भर
जळगाव : भारतीय अन्न महामंडळाच्यावतीने (एफसीआय) सरकारी गोदामातील विक्री करण्यात येणाऱ्या गव्हाच्या भावात २५० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने वाढ केल्याने बाजारपेठेतही गव्हाच्या भावात ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन त्याचे भाव २७५० ते २८५० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. त्यात यंदा पावसाळा लांबल्याने गव्हाचा हंगामही लांबणार असल्याने दरवाढीत भर पडत आहे.
नवीन गव्हाची खरेदी करावी लागणार असल्याने एफसीआयने सरकारी गोदामात असलेला गहू विक्री केला जात असून मध्यप्रदेशात व्यापाऱ्यांकडून त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.
मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होते. त्यामुळे तेथे व्यापाºयांकडून मालाची खरेदी केली जात आहे.
मात्र सध्या अन्न महामंडळानेच विक्री होणाºया गव्हाच्या भावात २५० ते ३०० रुपये प्रती क्विंटलने वाढ केली आहे.
आठ ते दहा दिवसांपूर्वी जो गहू भारतीय अन्न महामंडळाकडून १९५० ते २१०० रुपये प्रती क्विंटलने विक्री होत होता त्याचे भाव सध्या २२५० ते २४०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. या भावात व्यापाºयांनी मालाची खरेदी केल्यानंतर सर्व प्रक्रिया खर्च व वाहतूक खर्च यामुळे बाजारात विक्री होणाºया गव्हाचेही भाव वधारले आहेत. जो गहू २३५० ते २४५० रुपये प्रती क्विंटलने विक्री होत असे त्यांचे भाव आता २७५० ते २८५० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत.
एरव्ही दरवर्षी उन्हाळ्यात खरेदीच्या हंगामामध्ये २१०० ते २२०० रूपये अशा भावाने किरकोळ बाजारात विक्री होणारा गहू भारतीय अन्न महामंडळाकडूनच २१०० ते २२०० रूपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत असल्याने दर वाढले आहेत.
यंदा आवकही लांबणार
यंदा पावसाळा लांबल्याने रब्बी हंगामही लांबला आहे. परिणामी फेब्रुवारी महिन्यात बाजारात येणारा नवीन गहू यंदा मार्चमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यात सध्या व्यापारी, शेतकरी यांच्याकडे माल नसल्याने भारतीय अन्न महामंडळाकडून येणाºया जुन्या गव्हावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे नवीन माल येईपर्यंत गव्हाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एफसीआयने भाव वाढ केल्याने बाजारपेठेत गव्हाचे दर ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने वाढले आहेत. नवीन गव्हाची आवक लांबणार असल्याने आणखी भाव वाढ होऊ शकते.
-प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन, जळगाव.