जळगावात दररोज २०० टन गव्हाची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 09:31 AM2019-04-04T09:31:45+5:302019-04-04T09:43:04+5:30

वार्षिक धान्य खरेदीला मोठा वेग आला असून सध्या नवीन गव्हाची आवक आणि मागणीही वाढल्याने धान्य बाजारात मोठी रेलचेल दिसून येत आहे. जळगावात सध्या दररोज २०० टन गव्हाची खरेदी होत आहे.

Wheat sales of 200 tonnes per day in Jalgaon | जळगावात दररोज २०० टन गव्हाची विक्री

जळगावात दररोज २०० टन गव्हाची विक्री

Next
ठळक मुद्देनवीन गव्हाची आवक आणि मागणीही वाढल्याने धान्य बाजारात मोठी रेलचेल दिसून येत आहे. जळगावात सध्या दररोज २०० टन गव्हाची खरेदी होत आहे. एप्रिलमध्ये उन्हाचे प्रमाण वाढून गव्हातील ओलावादेखील कमी होतो या विचाराने ग्राहक एप्रिल महिन्यात धान्य खरेदीला प्राधान्य देत आहे.यंदा थंडीचे प्रमाण जास्त राहिल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामातील गव्हाला होऊन उत्पादन चांगले आल्याचे सांगितले जात आहे.

जळगाव - वार्षिक धान्य खरेदीला मोठा वेग आला असून सध्या नवीन गव्हाची आवक आणि मागणीही वाढल्याने धान्य बाजारात मोठी रेलचेल दिसून येत आहे. जळगावात सध्या दररोज २०० टन गव्हाची खरेदी होत आहे. मागणी वाढली तरी गव्हाचे भाव स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. या सोबतच दादरलाही मागणी वाढली असून भाव मात्र वाढत आहे.

दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून धान्य खरेदी सुरू होते व होळीनंतर तर या खरेदीला अधिक वेग येतो. त्यानुसार यंदा गेल्या आठवड्यापासून खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मार्च महिन्यापासूनच नवीन गव्हाची आवक सुरू झाली तरी मार्च महिन्यात फारशी खरेदी झाली नाही. मात्र एप्रिलमध्ये उन्हाचे प्रमाण वाढून गव्हातील ओलावादेखील कमी होतो या विचाराने ग्राहक एप्रिल महिन्यात धान्य खरेदीला प्राधान्य देत आहे.

वाढत्या थंडीचा अधिक फायदा

यंदा थंडीचे प्रमाण जास्त राहिल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामातील गव्हाला होऊन उत्पादन चांगले आल्याचे सांगितले जात आहे. यात महाराष्ट्रासह गव्हाची मुख्य बाजारपेठ असलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातून दररोज मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक सुरू आहे. दररोज साधारण २०० क्विंटल गव्हाची आवक होऊन तेवढ्याच मालाची विक्री होत आहे. ही आवक आणखी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा आवक चांगली असल्याने भाववाढीची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. खरेदीसाठी दाणाबाजारसह कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही गर्दी होत आहे.

भाव स्थिर

गव्हाला मागणी वाढली असली तरी आवकही चांगली असल्याने गव्हाचे भाव वाढले नसून गेल्या आठवड्यापासून ते स्थिर असल्याचे बाजारपेठेत चित्र आहे. यात १४७ गव्हाचे भाव २२०० ते २३०० रुपये, लोकवन गव्हाचे भाव २२०० ते २३०० रुपये, शरबती गहू २४०० ते २५०० रुपये, चंदोसी गव्हाचे भाव ३२०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे. गेल्या आठवड्यात गव्हाच्या भावात ५० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली होती.

खरेदीसाठी लगबग

सध्या उन्हाचे प्रमाण वाढल्याने गव्हातील ओलावा दूर होण्यासह खरेदी केलेला गहू वाळविण्यासाठी चांगले उन पडत असल्याने धान्य बाजारात गहू खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. यात महिलांची अधिक गर्दी होत असून वेगवेगळ्या दराच्या गव्हाला पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे.

गव्हासोबत, तांदूळ, डाळीचीही खरेदी

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच नवीन तांदुळाची आवक सुरू झाली तरी तेव्हापेक्षा आता तांदळाला जास्त मागणी आहे. गव्हासोबतच वर्षभराचा तांदूळ भरण्यासाठी लगबग असून मागणी वाढली तरी तांदळाचेही भाव स्थिर आहेत. या धान्य खरेदीसह डाळींनाही मागणी आहे.

दादर खातेय भाव

गेल्या काही वर्षापासून गव्हासोबतच दादरलाही चांगली मागणी वाढत असून तिचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. यंदाही दादरला चांगलीच मागणी असून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज ४ हजार क्विंटल दादरची आवक होत आहे. मागणी वाढल्याने या आठवड्यात दादरच्या भावात २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन दादर २५०० ते ३१०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.

सध्या गहू खरेदीसाठी धान्य बाजारात गर्दी असून दररोज गव्हासह, तांदूळ, डाळींना मागणी वाढत आहे. गव्हाची आवक चांगली असल्याने त्याचे भाव स्थिर आहेत.

- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव

सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही गव्हाच्या खरेदीसाठी चांगली ग्राहकी असून दादर खरेदीसाठीही गर्दी होत आहे.

- शशी बियाणी, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव.


 

Web Title: Wheat sales of 200 tonnes per day in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.