बारागाड्यांचे चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:34+5:302020-12-31T04:16:34+5:30

जळगाव : खान्देशात अक्षयतृतीया आणि बारागाड्या यांचे अतूट असे नाते आहे. त्यानुसार अक्षयतृतीयेच्या दिवशी पिंप्राळा व मेहरूण येथे ...

The wheels of the carriage stopped | बारागाड्यांचे चाके थांबली

बारागाड्यांचे चाके थांबली

Next

जळगाव : खान्देशात अक्षयतृतीया आणि बारागाड्या यांचे अतूट असे नाते आहे. त्यानुसार अक्षयतृतीयेच्या दिवशी पिंप्राळा व मेहरूण येथे बारागाड्या ओढल्या जातात. अक्षयतृतीयेला ओढल्या जाणाऱ्या या बारागाड्यांना शेकडो वर्षांची परंपरा आहे; मात्र यंदा प्रथमच यात खंड पडला तो कोरोनामुळे. त्यामुळे पिंप्राळा व मेहरूणमध्ये ना भवानीमातेचा, ना रामनाम, ना हनुमंतांचा जयघोष होऊ शकला.

पिंप्राळ्याचा अपूर्व उत्साह थांबला

भवानी मातेचा जयजयकार व गुलालाची उधळण करीत अक्षयतृतीयेनिमित्त पिंप्राळा येथील भवानीमातेच्या बारागाड्या मोठ्या उत्साहात ओढल्या जातात. बारागाड्यानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण असते व या निमित्ताने खेळणी व इतर साहित्य विक्री करणारे लहान-मोठे विक्रेते दाखल होतात. बारागाड्या पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. भगत, ग्रामस्थ हनुमान मंदिराला व भवानीमातेच्या मंदिराला प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर बारागाड्यांचे पूजन करण्यात येऊन बारागाड्या उत्साहात ओढल्या जातात; मात्र यंदा हा सर्व उत्साह थांबला. कोरोनाची बंधने असल्याने यात्रा, मिरव‌णुकीला बंदी असल्याने यंदा या बारागाड्या ओढल्याच गेल्या नाहीत.

बालगोपाल यात्रेला मुकले

बारागाड्यांवेळी पिंप्राळा येथील ग्रामस्थांसह शहरातील नागरिकांची गर्दी होत असते. त्यानंतर भाविक जत्रेत फिरण्याचा आनंद घेतात. चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत महिला, पुरुषांची लहान-मोठ्या दुकानांवर खरेदीसाठी गर्दी होत असते; मात्र यंदा यात्राही भरली नाही व बालगोपालांना खरेदीचा आनंदही घेता आला नाही.

मेहरूणमध्ये गुलालाची उधळण नाहीच

‘राम राम जय सीयाराम, जय भवानी माता की जय, हनुमान की जय’ अशा जयघोषांनी मेहरूणमध्ये अक्षयतृतीयेनिमित्त ओढण्यात येणाऱ्या बारागाड्यांचाही कार्यक्रम यंदा होऊ शकला नाही. १५२ वर्षांची परंपरा असलेल्या भवानीदेवीच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्यात येतात. या बारागाड्या महोत्सवालाही ९० वर्षांची परंपरा आहे. बारागाड्या ओढण्याची परंपरा कै. बहिरम रावजी भगत (वाघ) यांनी सुरू केली. त्याच्या आदल्या वर्षी विदर्भातून आलेल्या भगताने बारागाड्या ओढल्याचे सांगतात. त्यानंतर वंशपरंपरेने बारागाड्या ओढत असतात. यानिमित्त मेहरूण परिसरात यात्रोत्सवही असतो. या बारागाड्यांमध्ये गुलालाची उधळण आणि भाविकांची अलोट गर्दी असते. बारागाड्या ओढण्याच्या मार्गालगत रोशणाई करण्यात येते; मात्र यंदा कोरोनामुळे मेहरूणमध्ये गुलालाची उधळण झाली नाही व भाविकांचाही उत्साह यामुळे दिसून आला नाही.

Web Title: The wheels of the carriage stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.