जोडीदाराची निवड करताना वेळ देणे महत्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:24 PM2020-01-13T22:24:26+5:302020-01-13T22:24:32+5:30
तरुणाईची मोठी गर्दी : युवा संकल्प अभियान परिषदेतील सूर, तरूणांनी सद्सदविवेकबुध्दीने जगावे
जळगाव : तरुणाईला जीवनात नाक, कान, डोळे जागृत ठेवून चिकित्सकपणे निर्णय घेता आले पाहिजे. त्यासाठी सद्विवेकबुद्धीने तरुणांनी जगावे. तसेच जोडीदाराची निवड करताना पुरेसा वेळ देणेदेखील महत्वाचे आहे, असा सूर जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान परिषदेतून निघाला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी अॅड. एस .ए. बाहेती महाविद्यालयात जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक), राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, परेश शहा (शिंदखेडा), विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. सत्यजित साळवे, जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या राज्य कार्यवाह आरती नाईक, प्राचार्य डॉ. अनिल लोहार व अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे उपस्थित होते. या अभियानाचा समारोप १४ फेब्रुवारी ला कोल्हापुर येथे होणार आहे.
अविनाश पाटील यांनी विवाहातील अनिष्ट प्रथा आणि अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी हे अभियान समाज विकासात महत्वाची भूमिका निभावणार असल्याचे सांगितले.
समारोपाच्या अध्यक्षस्थानी असलेले अंनिसचे राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी यांनी जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. परिषदेला जळगाव, धुळे, नंदुरबार येथील विविध महाविद्यालयातील ३०० विद्यार्थी सहभागी झाले. यशस्वितेसाठी गौरव अळणे, प्रधान सचिव अशोक तायडे, अशफाक पिंजारी, विजय लुल्हे, मंजूर पिंजारी, संदीप कुमावत, सायली चौधरी, आर. वाय. चौधरी, दिलीप पाटील, शिरीष चौधरी, हमीद बारेला, कडू पाटील, प्रवीण नागपुरे, गुरुप्रसाद पाटील, पिरन अनुष्ठान, प्रकाश तामसवरे, डॉ. अनिल लोहार, डॉ. खेमराज पाटील यांनी परिश्रम घेतले.
जोडीदाराची निवड करताना छंद, आवडीनिवडी विचारात घ्या
भावी जोडीदाराची विवेकी पद्धतीने निवड का व कशी करावी याबाबतची प्रथम सत्रात चर्चासत्र घेण्यात आले.यात महेंद्र नाईक, निशा फडतरे व सचिन थिटे यांनी जोडीदाराची निवड करताना छंद, स्वभाव, आवडीनिवडी, विचारधारा यासह विविध विधायक बाबींना महत्व देणे गरजेचे असल्याचे सांगितले. दुसऱ्या सत्रात रूढी परंपरांना फाटा देऊन संघर्षमय पद्धतीने विवाह करणाºया तीन जोडप्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात जळगाव येथील विश्वजीत चौधरी-मिनाक्षी कांबळे, जामनेर तालुक्यातील नेरी येथील आशिष दामोदर-कांचन सोनवणे व औरंगाबाद येथील दीक्षा काळे -आनंद कन्नुर यांचा समावेश होता. या जोडप्यांची कोल्हापूर येथील स्वाती कृष्णात यांनी मुलाखत घेतली.
-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.
-धुळे, नंदूरबार, जळगावच्या विविध महाविद्यालयातील ३०० विद्यार्थी सहभागी.