लालकृष्ण अडवाणी यांचे पाळधी येथे स्वागत नेमके कधी केले ? - गुलाबराव पाटील यांना उदय भालेराव यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 12:36 PM2020-08-07T12:36:55+5:302020-08-07T12:37:46+5:30
कोणत्या आठवणींना उजाळा
Next
ref='https://www.lokmat.com/topics/jalgaon/'>जळगाव : ‘राम मंदिर शिलान्यासाच्या वेळी पाळधी येथे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मी स्वागत केले होते’, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. यामध्ये अडवाणी हे पाळधीला कधी आले व त्यांचे स्वागत केव्हा केले असा सवाल भाजपचे माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ कार्यकर्ते उदय भालेराव यांनी उपस्थित केला आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर ४ आॅगस्ट रोजी पत्रकारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत यासाठी आम्ही तिघे भाऊ तुरुंगात गेलो होतो, असे सांगत राम मंदिरासाठी आमच्या वडिलांनीही त्याग केला आहे. आमच्यावर त्यावेळी ३०२ चा गुन्हा दाखल झाला होता, असे सांगितले होते. तसेच भाजपच्या काळात राम मंदिर होतय असे नाही, त्यासाठी अनेकांनी त्याग केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी झालेले काही आरोप आपल्यावर घेतले. त्या साहेबांचे आम्ही मावळे आहोत. भूमिपूजनाच्या या सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी, कल्याणसिंग, मुरली मनोहर जोशी यांना भाजपने निमंत्रण दिले नाही. त्यांनाही हे लोक विसरले मग रामाला काय लक्षात ठेवतील असा टोलाही पाटील यांनी लगावला होता. या दरम्यान त्यांनी राम मंदिर शिलान्यास वेळी पाळधी येथे भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांचे स्वागत करणारा मी एकमेव होतो, असाही दावा केला होता. पाटील यांच्या या वक्तव्याचा उदय भालेराव यांनी समाचार घेत पालकमंत्र्यांचे वक्तव्य वाचून मस्त करमणूक झाली, असे नमूद केले. तसेच अडवाणी हे जिल्ह्यात कधी व कोठे-कोठे येऊन गेले याचे उदाहरणे देत लालकृष्ण अडवाणी यांचे पाळधी येथे स्वागत नेमके कधी केले ? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच संपूर्ण रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात अडवाणी जळगाव जिल्ह्यात आलेलेच नाहीत, मग गुलाबराव पाटील यांनी आडवाणींचे स्वागत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही भालेराव यांनी म्हटले आहे. या सोबत खास गुलाबराव पाटील यांच्या माहितीसाठी, अडवाणी आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात कोणकोणत्या वर्षी व जिल्ह्यात नेमके कोणत्या तालुक्यात आलेले आहेत याचा तपशीलही दिला. - अडवाणी जिल्ह्यात आलेले वर्ष व स्थळ- १९७४ मध्ये जनसंघाचे अध्यक्ष असताना जळगावात- १९९० मध्ये एकनाथराव खडसे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुक्ताईनगर येथे- १९९१ मध्ये जून महिन्यात डॉ. गुणवंतराव सरोदे यांच्या प्रचारार्थ जळगावात- १९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामनेर, वरणगाव, सावदा आणि भुसावळ येथे.- १९९६ मध्ये स्वर्णजयंती यात्रेच्या निमित्ताने चाळीसगावला- २००४ मध्ये धरणगाव येथे रेल्वे विद्युतीकरण उद््घाटन समारंभासाठी ( हेलिकॉप्टरने ) वरील प्रमाणे अडवाणी हे जिल्ह्यात आले असताना मग पाळधी येथे गुलाबराव पाटील यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे स्वागत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही भालेराव यांचे म्हणणे आहे.