शिंदे गटात सहभागी झालो तेव्हा सर्वच देव आठवले, गुलाबरावांनी सांगितली बाप्पाची महती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 11:48 PM2022-08-31T23:48:11+5:302022-08-31T23:52:19+5:30
जळगावीतल एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील आले होते. त्यांच्यासोबत त्याच कार्यक्रमात उद्धव ठाकरेंसोबत निष्ठेने राहिलेले गुलाबराव वाघही दिसून आले
जळगाव - राज्यात शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाकडून शिवसेना आमचीच असा दावा करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. मात्र, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांतील आमदारांमधील टिका टिपण्णी आता नित्याचीच झाली आहे. विशेष म्हणजे आज गणेशोत्सव साजरा करतानाही शहाजीबापू पाटील यांनी आमदार अमोल मिटकरींवर टिका केली होती. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही घरी गणरायाचे आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजकीय भाष्य केलं.
जळगावीतल एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील आले होते. त्यांच्यासोबत त्याच कार्यक्रमात उद्धव ठाकरेंसोबत निष्ठेने राहिलेले गुलाबराव वाघही दिसून आले. मात्र, दुसरीकडे गुलाबराव पाटील यांच्या घरी गणरायाचे आगमन झाल्यानंतर त्यांनी दर्शन घेऊन सहकुटुंब मनोभावे पूजा केली. अखंड परंपरेनुसार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी गणेशोत्सव साजरा केला गेला. मोठ्या भक्ती भावाने मंत्री पाटील यांच्या घरी दहा दिवस बाप्पांची स्थापना केली जाते. आजही मंत्री त्यांच्या घरी भक्तीपूर्ण वातावरणात बाप्पाची स्थापना केल्याचं पाहायला मिळाल. पाटील यांनी सपत्नीक गणरायाची स्थापना केली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
राजकारणासाठी कुठल्याही क्षेत्रात संकट हे येत असतात त्यावेळी आपल्याला गणपती बाप्पाची आठवण येते. आम्ही ज्यावेळेस शिंदे गटात सहभागी झालो होतो, त्यावेळी सर्वच देव आठवले होते, असे म्हणत मिश्कील राजकीय टिपण्णी गुलाबराव पाटील यांनी केली. देवाच्या आशीर्वादाने आजपर्यंत यश मला मिळाला आहे. यापुढेही देव नेहमी असेच पाठीशी उभे राहतील अशी प्रार्थना बाप्पाकडे केली आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितलं.