पोलीस येताच चोरट्यांनी धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:50 PM2019-05-21T12:50:52+5:302019-05-21T12:51:20+5:30
दोन संशयित ताब्यात
जळगाव : शहरात सध्या चोरीसह घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्या आहेत़ त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या गस्तींमध्ये वाढवली आहे़ अशातच रविवारी पहाटे ३.३० वाजता गांधीनगरात एक बंगल्यात चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटे कुलूप तोडत होते. त्याचवेळी तेथे गस्तीवर असलेले दोन पोलिस कर्मचारी पोहोचताच चोरट्यांनी धुम ठोकल्याचा प्रकार घडला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर चोरट्यांची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
कुलूप तोडण्याची तयारी
रविवारी पहाटेच्यावेळी गांधीनगरात एका बंगल्याच्या बाहेर दोन चोरटे अंधारात थांबून होते. त्यातील एकाने हातातील टॉमीच्या साह्याने कुलूप फोडण्याची तयारी केली.
तर दुसरा लक्ष ठेऊन होता. याचवेळी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी त्याच गल्लीत शिरले. यातील एक कर्मचारी दुचाकीवरुन उतरुन पायी चालत अंधाराच्या भागात गस्त करीत असतानाच चोरट्यांना ते दिसले. पोलीस दिसताच चोरट्यांनी जागेवरच दुचाकी सोडून तेथून धूम ठोकली़ दरम्यान, गस्तीवरील पोलिसांनी दोघांना पाठलाग केला़ मात्र, दोघेही अंधाराचा फायदा घेत पसार झाले़
त्यानंतर पोलिसांनी चोरट्यांनी आणलेली दुचाकी (क्ऱ एमएच़१९़सीए़००९८) पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणली. ही दुचाकी देखील चोरट्यांनी शहरातूनच चोरल्याचा संशय आहे.