धानवड ते चिंचोली रस्त्याची दुरूस्ती कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:26 PM2019-06-20T12:26:43+5:302019-06-20T12:27:29+5:30
रस्त्याची मात्र साधी डागडुजी देखील केली जात नसल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत
एकीकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांचा कायापालट होत असताना जळगाव तालुक्यातील धानवड ते चिंचोली रस्त्याची मात्र साधी डागडुजी देखील केली जात नसल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्याबाबत नेहमीच ओरड होत असते. या रस्त्यांवरून बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक आदी अवजड वाहने सातत्याने ये-जा करत असल्याने रस्ता लवकर खराब होतो. प्रशासनाचे त्याकडे लवकर लक्ष जात नाही. मात्र तरीही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत समावेश झालेल्या रस्त्यांचे भाग्य बदलले आहे. मात्र काही रस्ते मात्र खराब होऊनही त्यांची दुरूस्ती केली जात नाही. लोकप्रतिनिधींनाही लक्ष द्यायला सवड नसल्याचे चित्र बघायला मिळते. धानवड ते चिंचोली रस्त्याचीही अशीच अत्यंत दूरवस्था झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची डागडुजीच झालेली नाही. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना हे खड्डे चुकविणेही अवघड होत आहे. हे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नातच अपघात होत आहेत. नागरिकांना अक्षरश: कसरत करत ये- जा करावी लागते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वृद्ध व्यक्ती तसेच गरोदर महिलांना या रस्त्यावरून वाहनातून नेणे धोकादायक ठरत आहे. तसेच कुसुंबा, चिंचोली येथे जाणाºया विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. या खराब रस्त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत असून वाहनांच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याची गरज आहे. - भाऊसाहेब पाटील, धानवड ता.जळगाव.