जळगावात चोरीस गेलेली वाळू रात्रीतून परत येते तेव्हा....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:00 AM2017-12-08T11:00:53+5:302017-12-08T11:08:20+5:30
महसूल विभागाकडे संशयाची सुई : शासनाचे २० लाखांचे नुकसान
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.८ : पिंप्राळ्यातील मयूर कॉलनी व नवसाचा गणपती मंदिर परिसरात जप्त केलेल्या ६५० ब्रास वाळूसाठ्याचा लिलाव होऊनही तो घेण्यास संबंधित मक्तेदाराने नकार दिल्यानंतर पडून असलेली वाळू चोरीस गेली. मात्र याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार प्राप्त होताच रात्रीतून या ठिकाणी काही प्रमाणात वाळू आणून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
जिल्हाधिकाºयांच्या सूचनेवरून जिल्हा खनिकर्म अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन चारही वाळूसाठ्यांचा पंचनामा केला असता जेमतेम २५० ते ३०० ब्रास वाळू असल्याचे आढळून आले, त्यातही बहुतांश साठा हा ओल्या वाळूचा असल्याने रात्रीतूनच ती वाळू आणून टाकल्याचे स्पष्ट झाले. यामुळे महसूल विभागाकडे संशयाची सुई वळली आहे.
निविदेच्या पद्धतीमुळे वाढला संशय
या वाळूसाठ्याचा लिलाव करण्यासाठी तहसीलदारांनी वृत्तपत्रातून निविदा प्रसिद्ध करून लिलाव करणे अपेक्षित असताना केवळ तहसीलदार कार्यालयात एक नोटीस लावण्यात आली. त्यानुसार सोयीच्या माणसांनाच त्याची माहिती मिळाली व लिलावही झाला. त्यामुळे या प्रक्रियेबाबत व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला.
लिलावात भाग घेणाºया व्यावसायिकाने वाळू गटांसाठीही अर्ज भरला होता. मात्र त्यासाठीची २० टक्के रक्कम आरटीजीएसने भरल्याने ती विहित वेळेपेक्षा उशिराने जमा झाल्याने त्यास अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे या व्यावसायिकाने हा लिलावाचा वाळूसाठा खरेदीस नकार दिला. त्यानंतर मात्र हा वाळूसाठा चोरीस गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तक्रार होताच रात्रीतून आणून टाकली वाळू
वाळूसाठा चोरीस गेल्याने शासनाचे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार धनराज निंबाळकर नामक व्यक्तीने बुधवारी केली. विशेष म्हणजे या तक्रारीची माहिती लगोलग वाळू चोरून नेणाºयापर्यंतही पोहोचली. संबंधिताने बुधवारी रात्रीच या साठ्याच्या ठिकाणी वाळूसाठा चोरीस गेलेला नाही, जैसे-थे आहे, असे भासविण्यासाठी सुमारे १५० ब्रास वाळू रात्रीतून या ठिकाणी आणून टाकली. तक्रारीची दखल घेऊन पंचनाम्यासाठी गेलेल्या जिल्हा खनिकर्म अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी यांना या चारही ठिकाणांवर मिळून जेमतेम २५० ते ३०० ब्रास वाळू आढळून आल्याचे समजते. तसेच त्यातील बहुतांश वाळू ओली असल्याने रात्रीतून आणून टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.