जिल्ह्यातील आठ रेल्वेस्थानकांवरील धूळ कधी झटकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:33 AM2021-09-02T04:33:26+5:302021-09-02T04:33:26+5:30

सचिन देव जळगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून भुसावळ विभागातील सर्व पॅसेंजर सेवा बंद असल्यामुळे, ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी ...

When will the dust on eight railway stations in the district be shaken? | जिल्ह्यातील आठ रेल्वेस्थानकांवरील धूळ कधी झटकणार?

जिल्ह्यातील आठ रेल्वेस्थानकांवरील धूळ कधी झटकणार?

Next

सचिन देव

जळगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून भुसावळ विभागातील सर्व पॅसेंजर सेवा बंद असल्यामुळे, ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील पॅसेंजर थांबणाऱ्या स्टेशनवर सध्या स्मशान शांतता पसरली आहे. येथील प्रवासी कक्षांतील आसनांवर मोठ्या प्रमाणावर धूळ बसली आहे. त्यामुळे हे स्टेशन पूर्वीप्रमाणे कधी गजबजणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

भुसावळ विभागातून प्रत्येक मार्गावर पॅसेंजर धावत असल्यामुळे, गेल्या काही वर्षांमध्ये दळणवळणाच्या दृष्टीने नागरिकांची मोठी गैरसोय टळली आहे. यात विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पॅसेंजर गाड्या मोठ्या वरदान ठरल्या आहेत. मात्र, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे, ग्रामीण नागरिकांचे अर्थचक्रच कोलमडून गेले आहे. विशेषत: भुसावळ ते चाळीसगावदरम्यान येणाऱ्या भादली, शिरसोली, परधाडे, माहेजी, गाळण, नगरदेवळा, कजगाव, वाघळी या गावांना याचा मोठा फटका बसला आहे. पॅसेंजर बंद असल्यामुळे या गावांतील नागरिकांचे व चाकरमान्यांचे उद्योग-व्यवसायानिमित्त शहरात येणेच बंद झाले आहे. त्यात पॅसेंजरमुळे बाराही महिने गजबजणाऱ्या या स्टेशनवर सध्या प्रचंड शुकशुकाट आहे. त्यामुळे प्रवासी आसने व आतील कक्षात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. त्यात या स्टेशनवरही एक्स्प्रेस गाड्याही थांबत नसल्यामुळे, एकही प्रवासी स्टेशन परिसरात फिरत नसल्याचे दिसून आले.

इन्फो :

भुसावळ-मुंबई पॅसेंजर

भुसावळ -देवळाली पॅसेंजर

भुसावळ-नागपूर पॅसेंजर

भुसावळ-वडनेरा पॅसेंजर

भुसावळ-अमरावती पॅसेंजर

इन्फो :

बंद असलेली रेल्वेस्थानके

भादली, शिरसोली, परधाडे, माहेजी, गाळण, नगरदेवळा, कजगाव, वाघळी

इन्फो :

एक्स्प्रेस सुरू, मग पॅसेंजर बंद का?

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे कारण सांगून रेल्वेने पॅसेंजर बंद ठेवल्या आहेत. मात्र, टप्प्याटप्प्याने सर्व एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. पॅसेंजर सुरू केल्या की गर्दी होईल, असे रेल्वेतर्फे सांगण्यात येते. मग, आताही एक्स्प्रेस गाड्यांनाही गर्दी होऊन, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. हे रेल्वे प्रशासनाला दिसत नाही का?

नितीन सोनवणे, प्रवासी

इन्फो :

ग्रामीण भागातील प्रवाशांना शहरात येण्यासाठी पॅसेंजर गाड्या हे एकमेव परवडणारे साधन आहे. मात्र, शासनाने कोरोनाच्या नावाखाली अद्यापही पॅसेंजर गाड्या सुरू केलेल्या नाहीत. सध्या स्थितीला सर्व एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या आहेत, मग पॅसेंजर बंद ठेवण्यात अर्थ काय, सरकारचे धोरण समजत नाही. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता, तात्काळ पॅसेंजर सुरू करणे गरजेचे आहे.

योगेश पाटील, प्रवासी

Web Title: When will the dust on eight railway stations in the district be shaken?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.