खड्ड्यांचे ग्रहण सुटणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:45 AM2021-01-08T04:45:45+5:302021-01-08T04:45:45+5:30

वार्तापत्र अजय पाटील गेल्या दोन वर्षांपासून जळगावकर मोठ्या समस्यांना तोंड देत आपले दैनंदिन जीवन जगत आहेत. २०१० ते २०२० ...

When will the eclipse of the pits be over? | खड्ड्यांचे ग्रहण सुटणार तरी कधी?

खड्ड्यांचे ग्रहण सुटणार तरी कधी?

Next

वार्तापत्र

अजय पाटील

गेल्या दोन वर्षांपासून जळगावकर मोठ्या समस्यांना तोंड देत आपले दैनंदिन जीवन जगत आहेत. २०१० ते २०२० हे दहा वर्षांचे दशक संपल्यानंतर नव्या दशकात जळगावकरांच्या नशिबी चांगल्या सुविधा येतील का ? असा प्रश्न आता सातत्याने उपस्थित होत आहे. नव्या दशकात जळगाव शहराचा विकास कसा राहिल ? यावर भाष्य करण्यासाठी शक्यतो कोणताही ज्योतिष बोलायला तयार नाही. कारण गेल्या काही वर्षांपासून जळगावकर केवळ धूळ, चिखल, माती अन‌् खड्डे अशाच समस्यांना तोंड देत आहेत आणि उदासीन प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा ढिसाळ कारभार पाहता भाकित वर्तविणेदेखील चुकीचे ठरणार आहे. कारण गेल्या दोन वर्षांत शहरातील ६२४ कि.मी.पैकी तब्बल ५७० किमीचे रस्ते अमृत योजनेच्या कामामुळे फुटले आहेत. त्यामुळे शहरातील असा कोणताही कोणताही भाग नाही की ज्याठिकाणचा रस्ता फुटलेला नाही. हे खड्डे विकासाचे असले तरी आता या विकासाच्या खड्ड्यांचा वीट जळगावकरांना येऊ लागला आहे. ढिसाळ मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा नियोजनाअभावीच जळगावकरांवर ही वेळ आली आहे. नियमितपणे कर भरणा करूनदेखील जळगावकरांना मूलभूत सुविधांसाठी वंचित रहावे लागत आहे. सत्ताधाऱ्यांना एकही योजना धड चांगल्याप्रकारे राबवितादेखील येत नसल्याने जळगावची ओळख आता खड्डेगाव, धूळ गाव अशी होऊ लागली आहे. अमृत योजनांचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. नेहमी ‘अमृत’वर खापर फोडणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे सहा महिन्यांनंतर हे कारणदेखील राहणार नाही. शहरातील फुटलेल्या रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सुमारे ३०० कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. ३०० कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त न झाल्यास मनपाकडे इतका निधी निर्माण होणे कठीण आहे. त्यामुळे अमृतची कामे पूर्ण झाली तरी निधीअभावी कामे होणे कठीणच आहे. नवीन वर्षात खड्ड्यांचे ग्रहण सुटणार का ? असा प्रश्न जळगावकरांकडून विचारला जात आहे.

Web Title: When will the eclipse of the pits be over?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.