ही मंदिरे कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:24 AM2018-08-11T00:24:32+5:302018-08-11T00:24:52+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘आरसा मनाचा’ या सदरात लेखक विलास भाऊलाल पाटील यांनी व्यक्त केलेले विचार...

 When will these temples ever happen? | ही मंदिरे कधी होणार?

ही मंदिरे कधी होणार?

Next

गेल्या महिन्यात मनपा निवडणूक प्रचारानिमित्त जळगाव शहरात फिरण्याचा योग आला. त्यात अनेक बाबी ठळकपणे नजरेत आल्या. पण त्यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे शहरात सर्वत्र गल्लीबोळात असलेली असंख्य मंदिरं! मंदिर हा या देशातील सर्वाधिक चर्चेचा विषय. त्याच्या राजकीय वा धार्मिक अंगावर मला इथे चर्चा करावयाची नाही. ती ही जागा नव्हे. पण त्याच्या अनुषंगाने एका विषयावर मात्र मला नक्की चर्चा करावीशी वाटते. अर्थात हा विषय फक्त मंदिरापुरताच मर्यादित नाही.
भारतात हिंदूंची संख्या जास्त असल्यामुळे मंदिरांची संख्या जास्त आहे हे खरे, पण त्या-त्या प्रमाणात इतर धर्माच्या धार्मिक स्थळांची संख्याही काही कमी नाही. मूळात माझा मुद्दा धार्मिक स्थळांच्या संख्येचा नाहीच. लोकांच्या भावना जर तशा असतील आणि ते त्यानुसार मंदिर व तत्सम धार्मिक निर्मिती करत असतील तर त्याला माझा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. पण त्यामुळे उद्भवणारा एक महत्त्वाचा मुद्दा मी अधोरेखित करू इच्छितो तो असा की २१व्या शतकात भारतासारखा विकसनशील देश विज्ञान-तंत्रज्ञानाची कास समर्थपणे धरावयाची सोडून अधिकाधिक देव-देव करावयास लागला आहे आणि त्यातून श्रद्धेची सीमारेषा ओलांडून समाज अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटला जात आहे. तसेच दुसरी बाब देवभोळेपणाच्या नादात तासन्तास निव्वळ दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहून अनेक ‘मनुष्य तास’ आपण वाया घालवत आहोत, याचे भानच आपणास नाही. ‘तुझं घरंच नाही का तीर्थ
अन कशाला कार्ट मंदिरं धुंडाळत फिरतं!’
किंवा ‘मन चंगा तो कठोती में गंगा’
किंवा ‘परमेश्वर मूर्ती मंदिरात नाही तर
जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे
किंवा ‘नसे राऊळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरी’
यासारखी कितीतरी संतवचने आणि सुभाषिते आहेत. पण त्या साऱ्यांचा आम्हाला सोयीस्करपणे विसर पडलेला आहे. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आमच्या देशातील जवळपास सर्व मंदिरे सुंदर आणि चकचकीत आहेत आणि बहुतांशी श्रीमंत आहेत. काहीतर गडगंज आहेत. त्यांच्या सांपत्तीक स्थितीवर अनेकवेळा अनेक पातळ्यांवर चर्चा झालेली आहे आणि यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व जनतेच्या पैशातून किंवा देणगीतून झालेले आहे. मंदिरांच्या बाबतीत एवढा उदार असणारा समाज इतर तितक्याच किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाच्या दोन मंदिरांसाठी का कंजूष होतो, हे मला न उलगडलेले कोडे आहे. पहिले मंदिर म्हणजे
‘ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते
त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहून सुंदर हे’ असे ते ज्ञान मंदिर म्हणजे शाळा आणि दुसरे धर्मार्थ रुग्णालय जिथे गोरगरीब गरजूंचे प्राण वाचतात असे ठिकाण. पण या दोन्ही मंदिरांची अवस्था आज काय आहे. सर्वसामान्यांची मुले जिथे शिकतात त्या शासकीय शाळांची (भरमसाठ फी घेणाºया कार्पोरेट शाळा नव्हे) आज काय अवस्था आहे. भिंतीला तडे गेलेले, प्लॅस्टरचे पोपडे निघालेले, फरशा उखडलेल्या, रंगाचे, दिव्यांचे आणि पंख्यांचे तर नावच नाही. कौले फुटलेली, पत्रे गळकी, स्वच्छतागृहांचा अभाव, पिण्याचे पाणी नाही, क्रीडांगण नाही, रस्ता नाही, स्वच्छता नाही, शालोपयोगी साहित्य नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोटतिडकीने शिकविणारा अध्यापक वर्ग (स्टाफ) नाही. ज्या ठिकाणी आमच्या देशाची भावी पिढी घडत आहे त्या मंदिराचे हे असे चित्र. तिच अवस्था सरकारी धर्मार्थ रुग्णालयांची. तिथे रुग्ण बरा व्हायला जगायला येतो की मरायला हेच कळत नाही. तिथली दुरवस्था तिथली घाण. तिथल्या स्टाफची बेफिकीरी, बेपर्वाईही रुग्णाला जिवंतपणीच मरण यातना देऊन जातात. यासाठी समाज कधी देणगी देईल आणि ही ठिकाण कधी सुंदर, स्वच्छ, चकचकीत मंदिरात रुपांतरीत होतील?
-विलास भाऊलाल पाटील, जळगाव

Web Title:  When will these temples ever happen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.