जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील १८ हजार विद्यार्थी गेले कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:15+5:302021-06-16T04:21:15+5:30
- डमी - स्टार ८०५ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षी नववी झालेली मुले दहावीत जाताना यंदा मोठ्या ...
- डमी - स्टार ८०५
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षी नववी झालेली मुले दहावीत जाताना यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गळती झाल्याचे समोर आले. गेल्या वर्षी (२०१९-२०) नववीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत साधारण अठरा हजारांची तफावत आहे. म्हणजेच इतक्या संख्येने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले.
मागील वर्षी कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले. याचा सर्वाधिक परिणाम हा शिक्षण क्षेत्रावर झाला. एवढेच नव्हे तर कोरोना काळात कामगारांचे झालेले स्थलांतर तसेच गमवाव्या लागलेल्या नोक-यामुळे जवळपास हजारो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले. संसर्गाच्या भीतीने अनेकांनी इयत्ता नववी उत्तीर्ण होवून सुध्दा दहावीत प्रवेश न घेता गॅप घेण्याचा निर्णय घेतला. नुकतेच मार्च महिन्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते. त्यावेळी दहा दिवसातील सर्वेक्षणात जिल्ह्यात ५३३ शाळाबाह्य मुले आढळून आली होती. मात्र त्यापुढील म्हणजेच १४ वर्षांपुढील मुलांच्या परिस्थितीची गणती फारशी झालेली नसल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी नववीतील मुले दहावीत जाताना यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गळती झाल्याचे समोर आले. गेल्या वर्षी (२०१९-२०) नववीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत साधारण १८ हजारांची तफावत आहे. म्हणजेच इतक्या संख्येने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले.
बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर
- ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता न आल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला.
- कोरोना काळात भीतीमुळे शहरांतून गावात किंवा एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतरित झालेल्या कुटुंबांमुळे अनेक विद्यार्थ्यांची शाळा आपोआप सुटली.
- ग्रामीण भागात भविष्याविषयी चिंतेतून बालविवाहाची वाईट प्रथा फोफावली. त्यातून अनेक मुलींचे शिक्षण नववीनंतर कुटुंबीयांनीच थांबविले, त्यामुळे हा परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
- कोरोनामुळे हाताला काम नाही, कसे बसे कुटूंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यामुळे शाळेची फी कशी भरणार या चिंतेतून काही पालकांनी पाल्याचे प्रवेश काढून घेतले.
तुकड्या टिकविण्यासाठी पटसंख्येचा घोळ
नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. पण, तुकड्या टिकविण्यासाठी शाळांकडून अनेक वर्षांपासून अधिक विद्यार्थी प्रवेशित असल्याचे दाखविण्यात येत असते. हा प्रकार ग्रामीण भागांमध्ये अधिक आढळून येतो. एवढेच नव्हे प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत नसतो, पण तो हजेरी पुस्तकावर हजर असतो, हे अनेक वेळा तपासणी आढळून आले आहे. त्यामुळे शाळांमध्ये पटसंख्येचा घोळ असतो, असे शिक्षण तज्ज्ञांनी सांगितले. विशेषत: अनुदानित शाळांमध्ये हा प्रकार अधिक घडतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
कोरोनामुळे मजुर वर्गाचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. याचा परिणाम सुध्दा प्रवेशावर झाला. मार्च महिन्यात राबविलेलया शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात शिक्षणाच्या प्रवाहात नसलेली ५३३ विद्यार्थी शिक्षकांना आढळून आली होती. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे.
- बी.एस.अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
इयत्ता नववी विद्यार्थी (२०१९-२०) : ७६,३५८
दहावी परीक्षेसाठी अर्ज : ५८,३१७