दूध संघाचे ११७ कोटी गेले कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:56+5:302020-12-08T04:13:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा सहकार दूध संघावर मंदाकिनी खडसे चेअरमन झाल्यावर ६० कोटींचे कर्ज व अनुदान अशा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा सहकार दूध संघावर मंदाकिनी खडसे चेअरमन झाल्यावर ६० कोटींचे कर्ज व अनुदान अशा ११७ कोटी रुपयात नेमका कोणता विकास केला, असा प्रश्न उपस्थित करत दूध संघात मोठा अपहार झाल्याचा आरोप संस्थेतील माजी सुरक्षा अधिकारी एन. जे. पाटील यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केलेले आहेत.
मंदा खडसे यांच्या कार्यकाळातील विविध प्रकारच्या सात गैरप्रकारांची तक्रार पोलीस व न्यायालयात याचिका दाखल केलेल्या असून यातील दोन मुद्दयांची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मंदा खडसे यांच्याकडे पदभार आला तेव्हा संघावर कसलेच कर्ज नव्हते, शिवाय संघाच्या ठेवी इतर बँकांमध्ये होत्या. नंतर दूध संघावर ६० कोटी रूपये कर्ज तसचे ५७ कोटींचे अनुदान अशा ११७ कोटीत दूघ संघाचा नेमका काय विकास झाला असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
२०१४ मध्ये मंत्रीमंडळातील सर्वात प्रभावी मंत्री एकनाथ खडसे होते. त्यांच्याकडे कृषी व दुग्धविकास मंत्रालय हे खाते होते. २०१५ साली आपण दूध संघाच्या गैरप्रकारांबाबत त्यांच्याकडेही तक्रार दिली होती, मात्र, मंत्री असतानाही त्यांनी कारवाई न केल्याने आपण त्यानांही तक्रारीत आरोपी केले होते, न्यायालयीन व्यवस्थेत १८ याचिकांवर सुनावणी सुरू असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
रेकॉर्ड जाळले
दूध संघातील १९७५ ते २००० पर्यंतचे सर्व रेकॉर्ड विद्यमान चेअरमन मंदा खडसे यांच्य काळात जाळून टाकण्यात आले आहे. यासाठी शासनाकची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही, आपण २०१३ मध्ये पोलीस व न्यायालयात ११३ जणांविरोधात तक्रार दिलेली आहे. पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. २०१६ मध्ये कुठले रेकॉर्ड नष्ट करावे असा ठराव झाला असताा सरसकट सर्वच रेकॉर्ड नष्ट करण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.
प्रशासकाची नियुक्ती का नाही
ऑगस्ट २०२० मध्ये दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली असतानाही प्रशासकाची नियुक्ती न करता राजकीय दबावापोटी संचालकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. एकिकडे ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक होत असताना दूध संघावर अद्यापही प्रशासक नेमलेला नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.
३ हजार कोटींचा घोटाळा
१९९५ पासून ते २०२० पर्यंत कामे बाेगस असून जेवढी उलाढाल आहे. तेवढा ३ हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. याबाबची अन्य माहिती आपण नंतर पुन्हा पत्रकार परिषदेत देऊ असेही त्यांनी सांगितले. खडसे व संचालक मंडळाने एनडीबीच्या माध्यमातून प्रकल्प उभा केला तो बनावट असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. या सर्व प्रकारांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.