वाघ पिंजऱ्यात असो की जंगलात तो वाघच असतो, संजय राऊतांचा पाटलांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 08:48 PM2021-06-11T20:48:30+5:302021-06-11T20:49:15+5:30
खासदार संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला
जळगाव/चोपडा : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात वाघ शब्दावरुन चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर दोस्तीवरुन शाब्दीक कुस्ती करताना दिसत आहेत. आता, वाघ पिंजऱ्यात असो की जंगलात, तो वाघच असतो. हिंमत असेल तर वाघाशी मैत्री करायला पिंजऱ्यात या, महाराष्ट्रात वाघाचे राज्य आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलं होतं. त्यानंतर नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीदेखील वाघाशी कुणाची मैत्री होत नाही, मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं. आता, पुन्हा राऊत यांनी यासंदर्भात विधान केले आहे. खासदार राऊत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेच्यावतीने चोपडा येथे रावेर लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मोदी नव्हते तेंव्हापासून वाघाशी मैत्री होती. वाघाशी मैत्री करणे सोपे नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघ ठरवित असतो. महाराष्ट्रावर वाघाचे राज्य आहे, असे राऊत यांनी म्हटले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल, असे म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले असता राऊत म्हणाले की, नाना पटोले जर स्वबळावर लढून ते केंद्रात सत्ता आणणार असतील आणि मोदींना आव्हान उभे करीत असतील तर त्यांचे स्वागत आहे. काँग्रेसचा पंतप्रधान व्हायला हवा, आमचा त्यांना पाठिंबा असेल, असेही राऊत यांनी म्हटले.
वाघाच्या भांडणात छगन भुजबळांचीही उडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. "राज्याच्या अनेक प्रश्नांचे उत्तर केंद्राकडे आहे. त्यामुळे जमवून घ्यावे लागते. मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असते, वाघ पंजाही मारू शकतो," असं सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सुरू झालेल्या चर्चेच्या संदर्भात बोलताना भुजबळ यांनी केलं.