भुसावळात गोळीबार कोणी व कोणत्या गटाकडून करण्यात आला, कारण गुलदस्त्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 05:16 PM2019-03-02T17:16:19+5:302019-03-02T17:19:48+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदावरून दोन गटात वाद झाला. या वादात एका गटाकडून पिस्तूलमधून गोळीबार करण्यात आला. मात्र हा गोळीबार कोणी व कोणत्या गटाकडून करण्यात आला. यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींची पोलीस कोठडी संपली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तरीही निष्पन्न झाले नाही.
भुसावळ, जि.जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदावरून दोन गटात वाद झाला. या वादात एका गटाकडून पिस्तूलमधून गोळीबार करण्यात आला. मात्र हा गोळीबार कोणी व कोणत्या गटाकडून करण्यात आला. यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींची पोलीस कोठडी संपली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तरीही निष्पन्न झाले नाही.
दरम्यान, तपासाधिकारी पी.एस.आय.सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला असता शुक्रवारी आरोपींना दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग डी.एम .शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आरोपींच्या चौकशीसाठी त्यांच्याकडून शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पिस्तूलमधून गोळ्या कोणी व कोणत्या गटाकडून झाडण्यात आल्या. त्यासंदर्भात मात्र अद्याप माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्षपदासाठी २३ रोजी बाळा सोनवणे यांची निवड झाली होती तर २४ रोजी दुसऱ्या गटाने पुन्हा बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर २५ रोजी सकाळी अडीच वाजेच्या सुमारास रेल्वे दवाखान्यामागे समता नगर जवळ, भाजपाचे नगरसेवक तथा बांधकाम समितीचे सभापती रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरासमोर दोन गटांमध्ये तुफान दगडफेक करण्यात आली, तर एका गटाकडून पिस्तूल म्हणून गोळीबार करण्यात आला. घटना घडल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलम रोहन व प्रभारी पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर गोळीबार कोणत्या गटाकडून व कोणी केला ही माहिती २४ तासांनंतर देण्यात येईल, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक मतानी यांनी दिले होती.
या घटनेत भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हम्या, बाळा मोरे, बाळा सोनवणे, गिरीश तायडे व शुभम कांबळे या पाच आरोपींना अटक करण्यात आली. तर त्यानंतर अक्षय प्रताप माहुरकर (२१) रा. चक्रधरनगर यास अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला होता. योगेश मोघे, नितीन मोरे, विकास गोंड, सोनू सपकाळे, विकी मेश्राम रा. कंडारी. त्याचप्रमाणे राहुल सोनवणे, सुरेश मेढे , बाळा सोनवणे, हंसराज रवींद्र खरात, सागर रवींद्र खरात, गोलू खरात, आतिष खरात, पंकज खरात यांच्यासह इतर आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले. तपास पीएसआय सूर्यवंशी करीत आहे.