तीन हजारांची लाच घेतांना जि़प़तील लिपिकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:23 AM2019-03-09T11:23:35+5:302019-03-09T11:24:12+5:30
पेन्शचा टेबल ठरला टेन्शनचा
जळगाव : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या पेन्शन फाईलमधील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक देविदास ओंकार सोनवणे (५७, रा.वाघ नगर, जळगाव) यास रंगेहात पकडण्यात आले. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत़ त्यांची पेन्शन फाईल मधील त्रुटींची पूर्तता करून ही फाईल पुढे पाठविण्याच्या मोबदल्यात सोनवणे याने तक्रारदाराकडे गुरूवारी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
दुपारी सोनवणे हा लाच घेण्यासाठी बाहेर आला. त्यावेळी त्याला याची कुणकुण लागली असावी.
तक्रारदारासह तो बेंडाळे चौकातील जि.प.च्या अल्पबचत भवनाजवळील मार्केटमध्ये आला. जिन्यावर सोनवणे याने तीन हजार रुपयांची लाच घेतली आणि त्याच्या मागावर असलेल्या पथकाने सोनवणे यास अटक केली.
पेन्शचा टेबल ठरला टेन्शनचा
लिपिक सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीला फक्त सात ते आठ महिने राहीले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडे पेन्शनचा टेबल होता. हा पेन्शनचा टेबल जाता जाता त्यांच्यासाठी टेन्शन देणारा ठरला. अशी चर्चाही त्यांच्याबाबत जिल्हा परिषदेत चर्चिली जात होती.