जळगावात शतपावली करताना महिलेला भरधाव दुचाकीस्वाराने उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:15 PM2018-10-23T13:15:57+5:302018-10-23T13:16:48+5:30
जिल्हा क्रीडा संकुलानजीक अपघात
जळगाव : रात्री जेवण झाल्यानंतर पतीसह शतपावली करीत असताना सविता विकास बिर्ला (वय ५२, रा.नवी पेठ, जळगाव) यांना मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने उडविल्याची घटना रविवारी रात्री दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारानजीक घडली. दरम्यान, साडेपाच तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी पहाटे साडेतीन वाजता सविता यांची प्राणज्योत मालवली.
दुचाकीस्वार तरुणही जखमी
सविता बिर्ला यांना धडक देणारा तुषार चौधरी हा तरुण देखील या अपघातात जखमी झाला आहे. डोक्याला व पाठीला त्याला मार बसला आहे. बिर्ला दाम्पत्य हे जुन्या एम्लॉयमेंट कार्यालयाच्या दिशेने रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाल्याचे जखमी तरुणाचे म्हणणे आहे. तुषार हा आयटीआयचा विद्यार्थी आहे. मित्र विजय पवार याला सोबत घेऊन रेल्वे स्टेशनकडे जात असताना ही घटना घडल्याचे तुषारचे म्हणणे आहे.
दुचाकीची जीवघेणी गती
या अपघातात तुषार चौधरी या तरुणाच्या दुचाकीची गती अतिशय खूप मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे या अपघातात दुचाकी दुभाजकावर आदळून तीन वेळा पलटी झाली. त्यात तो बचावला.
मुलांचा लाड करण्यासाठी जीवघेण्या दुचाकी पालक त्यांच्या हातात देतातच कसे? असा सवाल मनिष बाहेती यांनी उपस्थित केला आहे. पाल्यांचा जीव धोक्यात जावू शकतो याची जाणीव असतानाही १६० सीसीच्या दुचाकी पालकांकडून पाल्यांना दिल्या जात आहेत.
भरधाव वाहने उठली जीवावर; २० वर्षांपासूनची शतपावली थांबली
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नवीपेठेतील निखिल एजन्सीचे (तेलाचे दुकान) मालक विकास केदारनाथ बिर्ला व त्यांची पत्नी सविता हे दाम्पत्य रविवारी रात्री दहा वाजता जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी नवीन बसस्थानक परिसरात आले होते. तेथून परत घराकडे जात असताना जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने (एमएच १९- डीबी ०२२१) सविता यांना जोरदार धडक दिली. दरम्यान, सविता व पती विकास हे गेल्या २० वर्षांपासून याच रस्त्यावर दररोज शतपावली करीत होते, मात्र आता ती थांबली आहे.