भुसावळ येथे मुलाच्या लग्नात नाचताना करताना वडीलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:03 PM2018-05-08T12:03:23+5:302018-05-08T12:03:23+5:30
नातेवाईक हळहळले
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ८ -मुलाच्या लग्नाच्या वरातीत नाचताना अचानक चक्कर येऊन कोसळलेल्या वडीलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी दुपारी भुसावळ येथे घडली. गोपाळ खंडू राणे (वय ६०, रा.कोंडवा खुर्द, पुणे, मुळ रा.तळवेल) असे त्यांचे नाव आहे. मुलाची लग्न घटीका जवळ आली असताना त्याच्या अंगावर अक्षता टाकण्याची इच्छा अपूर्ण राहिली. ह्दयविकार किंवा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.
नवरदेव मुलाला घटना कळविलीच नाही
गोपाळ राणे यांना दवाखान्यात आणल्यानंतर तिकडे मुलगा प्रशांत याचे लग्न लावण्यात आले. वडीलांच्या प्रकृतीची त्याला माहिती देणे टाळले. आपल्या डोळ्यासमोर मुलाचे लग्न व्हावे, त्याच्या अगांवर अक्षता टाकाव्यात ही वडीलांची इच्छा अपूर्णच राहिल्याने वºहाडी मंडळींनाही गहिवरुन आले होते. जिल्हा रुग्णालय ड्युटीला असलेले हेडकॉन्स्टेबल विजय निकुंभ यांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. राणे यांना दोन विवाहित मुली व प्रशांत हा एक मुलगा आहे. नवरी इंदूरची आहे. राणे कुटुंब पुण्यात स्थायिक आहेत. दोन्ही कडील नातेवाईक मंडळींना सोयीचे ठरावे यासाठी लग्नाचे ठिकाण भुसावळ निवडण्यात आले होते.
पाणी प्यायले अन् क्षणातच कोसळले
याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, वीज वितरण कंपनीतून सेवानिवृत्त झालेले गोपाळ खंडू राणे यांचा मुलगा प्रशांत याचा सोमवारी भुसावळ शहरात विवाह होता. लग्नात सर्वत्र उत्साह होता. नवरदेव मंडपात पोहचल्यावरही मुलाचे वडील व अन्य नातेवाईक नाचत होते. तहान लागल्याने गोपाळ राणे यांनी नाचणे थांबवून पाणी घेतले.
त्यानंतर काही क्षणातच राणे हे चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने भुसावळ शहरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. शहरातील मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.