कार शिकत असताना सुटले नियंत्रण अन् झाडावर आदळली कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:13 AM2020-12-26T04:13:24+5:302020-12-26T04:13:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कार शिकत असताना अचानक ब्रेकऐवजी एक्सीलेटरवर पाय गेल्याने सुसाट कार झाडावर आदळल्याची घटना शुक्रवारी ...

While learning to drive, the car lost control and crashed into a tree | कार शिकत असताना सुटले नियंत्रण अन् झाडावर आदळली कार

कार शिकत असताना सुटले नियंत्रण अन् झाडावर आदळली कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कार शिकत असताना अचानक ब्रेकऐवजी एक्सीलेटरवर पाय गेल्याने सुसाट कार झाडावर आदळल्याची घटना शुक्रवारी सकाळी काव्यरत्नावली चौकात घडली. सुदैवाने वेळीच कारमधील एअरबॅग उघडल्याने कारमधील तिन्ही तरुण थोडक्यात बचावले. परंतु, जोरदार धडक बसल्याने कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला तर झाडाची मोठी फांदी तुटून कारवरच पडली.

शहरातील नंदनवन कॉलनी येथे आर.बी. हिंगणेकर हे वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा रक्षण यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. काव्यरत्नावली चौकात एचडीएफसी बँकेच्या बाजूला व्यवसायाचे ऑफिस आहे. दरम्यान, गुरुवारी ऑफिसमध्ये रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. यामुळे रक्षण हा शिकण्यासाठी घरुन त्यांची एम.एच. १९ सी.झेड १५३२ क्रमांकाची कार घेऊन आला होता. शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर रक्षण हा त्याच्या सोबतच्या मित्रांसोबत काव्यरत्नावली चौकातील भर रस्त्यावर कार शिकत होता.

नियंत्रण सुटले आणि कार धडकली झाडावर

काव्यरत्नावली चौकात कार शिकत असताना रक्षणचा पाय अचानक ब्रेकऐवजी एक्सीलेटरवर पडला आणि क्षणात कार सुसाट धावल्यामुळे रक्षणचे कारवरील नियंत्रण सुटले. सुसाट कार ही काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेलगत असलेल्या वृक्षावर जाऊन धडकली. दरम्यान, धडक देताच कारमधील एअरबॅग उघडली त्यामुळेच कारमधील रक्षण सह त्याचे दोघे मित्र यांना कुठलीही दुखापत झाली नाही.

कारवर पडली झाडाची फांदी

दरम्यान, धडक इतकी जोरदार होती की ज्या झाडाला धडक दिली होती त्या झाडाची भली मोठी फांदी काहीवेळाने कारवर तुटून पडली. अपघाताच्या मोठ्याने झालेल्या आवाजाने सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या सर्व नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. महापालिका कर्मचार्यांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी ट्रॅक्टरसह घटनास्थळ गाठले. याठिकाणी कर्मचाऱ्यांनी झाडाची फांदी बाजूला करण्यासह खाजगी क्रेन मशीन बोलवून त्याद्वारे कार रस्त्याच्या बाजूला केली. दोन महिन्यांपूर्वीच ही कार खरेदी केली असल्याची माहिती हिंगणेकर यांनी दिली. तसेच मुलाकडे लर्निंग लायसन्स असून त्याच्या मित्राकडे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स आहे. त्यामुळे मुलगा रक्षणाला त्याचा मित्र कार शिकवत असताना हा अपघात घडल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: While learning to drive, the car lost control and crashed into a tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.