तर अभियांत्रिकी, विधी शाखांसह अन्य अभ्यासक्रमांच्याही परीक्षा स्थगित होणार!

By अमित महाबळ | Published: February 20, 2023 05:26 PM2023-02-20T17:26:30+5:302023-02-20T17:26:30+5:30

प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप

... while the exams of engineering, law branches and other courses will also be suspended | तर अभियांत्रिकी, विधी शाखांसह अन्य अभ्यासक्रमांच्याही परीक्षा स्थगित होणार!

तर अभियांत्रिकी, विधी शाखांसह अन्य अभ्यासक्रमांच्याही परीक्षा स्थगित होणार!

Next

अमित महाबळ, जळगाव: राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार (२० फेब्रुवारी) पासून बेमुदत संपावर गेले आहेत. हे आंदोलन मंगळवारपर्यंत संपुष्टात न आल्यास त्याचा परिणाम अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांवर होणार आहे. त्या स्थगित होऊ शकतात. या आंदोलनात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग आहे. कर्मचाऱ्यांचे २ फेब्रुवारीपासून सर्व बोर्डाच्या व विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरू आहे. त्या अंतर्गत सोमवारपासून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे.

आंदोलकांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर सेवक संयुक्त कृती समिती राज्य सरकारशी चर्चा करत आहे. पण सकारात्मक निर्णय लेखी स्वरुपात मिळत नसल्याने आंदोलन सुरूच ठेवायचा निर्धार करण्यात आला आहे. त्यांना विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. एन.मुक्टोकडून विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपला पाठिंबा देण्यात आला. यावेळी केंद्रीय कार्यकारिणी अध्यक्ष प्रा. अनिल पाटील, अध्यक्ष प्रा. आर. एस. बेंद्रे, प्रा. बाविस्कर, प्रा. किशोर पवार, प्रा. कमळजा, प्रा. विशाल पराते, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दुर्योधन साळुंखे, सचिव भैय्या पाटील, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जयंत सोनवणे, सचिव अरुण सपकाळे, अधिकारी फोरमचे के. सी. पाटील, एस. आर. गोहिल, शरद पाटील आदी उपस्थित होते.

संप लांबल्यास परीक्षांवर परिणाम

हा संप लांबल्यास त्याचा परिणाम आगामी परीक्षांवर होणार आहे. विद्यापीठाला या परीक्षा स्थगित कराव्या लागतील. केवळ परीक्षा स्थगित होणार नाहीत, तर त्यानंतर पेपर तपासणी, निकालाचे काम देखील थांबणार आहे. तसेच आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्या आहेत त्यांचे व्हेरिफिकेशन, मार्कशिट आदी कामे देखील थांबतील. अभियांत्रिकीच्या परीक्षा दि. २२ फेब्रुवारीपासून आहेत. दि. २३ पासून एमबीए व एमसीएच्या परीक्षा सुरू होणार आहे. त्यानंतर महिनाअखेरीस विधी शाखेच्या परीक्षा नियोजित आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.

प्राचार्यांना उघडावे लागले केबिन

कर्मचाऱ्यांच्या संपाला खान्देशातून १०० टक्के प्रतिसाद मिळत आहे. नूतन मराठा महाविद्यालयात कर्मचारी संपावर असल्याने प्राचार्य एल. पी. देशमुख यांना स्वत:लाच केबिन आणि कार्यालय उघडावे लागले, अशी माहिती मिळाली.

शिक्षक आमदारांची भेट

मू. जे. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी आहेत. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. येत्या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दराडे यांना देण्यात आले. निवेदन देताना मू. जे. महाविद्यालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस. बी. तागर, जी. आर. सोनार, उपाध्यक्ष सचिव एम. एल. धांडे, कुलसिचव जगदीप बोरसे, दत्तात्रय कापुरे, ईश्वर पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 

राज्यातून ३० हजार कर्मचारी संपात सहभागी 

खान्देशात सुमारे १५०० तर राज्यभरात ३० हजार विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी आहेत, अशी माहिती एस. बी. तागर यांनी दिली.

विद्या शाखा - विद्यार्थी संख्या- परीक्षा सुरू होण्याची तारीख

  • एमबीए - ७६५ - दि. २३ फेब्रुवारी
  • एमसीए - ५२६ - दि. २३ फेब्रुवारी
  • विधी - ११२० - दि.२७ फेब्रुवारी
  • अभियांत्रिकी - १७२२ - दि.२२ फेब्रुवारी

Web Title: ... while the exams of engineering, law branches and other courses will also be suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव