व्हाॅट्सॲप, मेलसह पोस्टाद्वारे पाठविला भाजप नगरसेवकांना व्हीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:16 AM2021-03-16T04:16:27+5:302021-03-16T04:16:27+5:30
कोणतेही कारण सोडण्याच्या तयारीत भाजप नाही : २५ नगरसेवकांना प्रत्यक्ष हातात दिला व्हीप लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापौर ...
कोणतेही कारण सोडण्याच्या तयारीत भाजप नाही : २५ नगरसेवकांना प्रत्यक्ष हातात दिला व्हीप
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापौर व उपमहापौरपदासाठी गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी महासभेत हजर राहून व भाजपतर्फे देण्यात येणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याबाबत भाजपकडून आपल्या नगरसेवकांना सोमवारी व्हीप बजावण्यात आला आहे. २५ नगरसेवकांना रविवारी विमानतळावरच प्रत्यक्ष हातात व्हीप देण्यात आले होते. तर सोमवारी भाजपच्या ५७ नगरसेवकांना व्हॉट्सॲप, ई-मेल, पोस्ट व प्रत्यक्ष घरपोच या पद्धतीने व्हीप बजाविण्यात आले असल्याची माहिती भाजप गटनेते भगत बालाणी यांनी दिली आहे.
भाजपचे २७ नगरसेवक रविवारी गायब झाल्यानंतर भाजपकडून आता उर्वरित नगरसेवकांना राखून ठेवण्यासाठी सावध पावले टाकली जात आहेत. तसेच फुटलेल्या नगरसेवकांना परत आणण्यासाठी कायद्याच्या चौकटींचा अभ्यास केला जात आहे. अनेक नगरसेवक व्हीप न घेताच सहलीला रवाना झाले आहेत. यामुळे भाजपकडून अशा नगरसेवकांना व्हॉट्सॲप, ई-मेल व अन्य माध्यमांद्वारे व्हीप पाठविण्यात आला आहे. ऐनवेळी नगरसेवकांकडून व्हीप न मिळण्याचे कारण राहू नये म्हणून भाजपकडून अनेक मार्गांनी भाजप नगरसेवकांपर्यंत व्हीप बजावण्यात आले आहेत.
भाजपने दिलेल्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करा...
भाजपकडून बजाविण्यात आलेल्या व्हीपमध्ये म्हटले आहे की, १८ रोजी होणाऱ्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी हजर राहावे, अन्यथा पक्षांतर बंदीचे उल्लंघन म्हणून अपात्रतेची कारवाई करण्यात येईल, असा इशारा व्हीपद्वारे देण्यात आला आहे.