जलतरण तलावातील वादाचा भोवरा जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:17 AM2021-01-03T04:17:20+5:302021-01-03T04:17:20+5:30
गेल्या काही दिवसांपासून या जलतरण तलावाच्या साफसफाईचे काम सुरू होते. त्यानंतर तलावात काही जण पोहण्यास देखील येत होते. ...
गेल्या काही दिवसांपासून या जलतरण तलावाच्या साफसफाईचे काम सुरू होते. त्यानंतर तलावात काही जण पोहण्यास देखील येत होते. शहरातील इतर जलतरण तलाव सुरू झाल्यावर देखील क्रीडा संकुलातील खेळाडुंच्या हक्काचा जलतरण तलाव अद्याप सुरू होऊ शकलेला नाही.
कोरोनाच्या काळात हा जलतरण तलाव उन्हाळ्यातच बंद होता. या काळातील शुल्क भरण्यासाठी क्रीडा कार्यालयाकडून ठेकेदार संस्थेला पत्र दिले जात आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या ठेकेदाराकडे जवळपास नऊ लाखाच्या वर रक्कम बाकी आहे. त्यात कोविडच्या काळातील रक्कम कपात करण्यात आली आहे.
त्यामुळे हा तलाव अद्याप खेळाडुंसाठी खुला होऊ शकलेला नाही. इतर जलक्रीडांना शासनाने सुरू करण्याबाबत सवलती दिल्या आहेत. हा तलाव अद्याप सुरू होऊ शकलेला नाही.त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे.
जिल्ह्यात कनिष्ठ गटापासून वरिष्ठ आणि ज्येष्ठ गटात अनेक जण राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळतात. मात्र त्यांच्यासाठी हा तलाव सुरू होऊ शकलेला नाही.
ठेकेदाराकडून कराराचे पालन नाही
जिल्हा क्रीडा कार्यालयाने या ठेकेदाराकडून तीन वर्षांपासून बाकी असल्याची माहिती आहे. त्याचा करार जून २०२१ पर्यंत आहे. मात्र नियमीतपणे पैसे भरलेले नाही. ठेकेदाराला या आधीदेखील पैसे भरण्यासंदर्भात नोटिस दे्ण्यात आल्या होत्या. मात्र बाकी खुप वाढली आहे. त्यामुळे सध्या जलतरण तलाव बंद करण्यात आले.
शहरातील इतर प्रमुख जलतरण तलाव सुरु
सध्या शहरातील पोलीस जलतरण सुरू आहे. त्यामुळे बहुतांश जलतरणपटू त्या तलावावर सराव करण्यासाठी जात आहेत. शहरात सर्व गटात मिळून १०० च्यावर राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडू आहे. आता नजीकच्याकाळात त्यांच्या स्पर्धा देखील सुरु होऊ शकतात. त्यामुळे या खेळाडूंना सरावाची आवश्यकता आहे.