कुजबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:49+5:302021-04-08T04:16:49+5:30
जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने गेल्यावर्षी दिवाळीत अनेक हंगामी गाड्या सुरू केल्या. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत ...
जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने गेल्यावर्षी दिवाळीत अनेक हंगामी गाड्या सुरू केल्या. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या गाड्यांना वेळोवेळी मुदतवाढ देऊन चालविण्यात येत आहे. मात्र, गेल्या महिन्यापासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने, रेल्वे बोर्डातर्फे या सुरू केलेल्या विशेष गाड्या पुन्हा बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या रेल्वे प्रवासी व प्रवासी संघटनांमध्ये जोरात सुरू आहे. याबाबत अनेक प्रवासी रेल्वे प्रशासनाकडे संपर्क साधून गाड्यांची माहिती जाणून घेत आहेत.
सद्यस्थितीत गाड्यांची संख्या कमी असली तरी, प्रवाशांना बाहेरगावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा झाली आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे सहा महिने रेल्वेसेवा बंद होती. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. नागरिकांना खासगी वाहनांनी हजारो रुपये भाडे खर्च करून प्रवास करावा लागला. मात्र, यंदा कोरोनामुळे पुन्हा रेल्वे बंद झाल्या तर किती हाल होणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही गाड्या बंद होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी सध्याचे कोरोनाचे वातावरण पाहता प्रवाशांमध्ये गाड्या बंद होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगत आहे.