कुजबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:13 AM2021-07-20T04:13:18+5:302021-07-20T04:13:18+5:30
पुण्याच्या विमानसेवेबाबत खासदारांच्या पाठपुराव्याचे काय झाले.. जळगाव : मुंबईची विमानसेवा सुरू झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी लगेच पुण्याची विमानसेवा ...
पुण्याच्या विमानसेवेबाबत खासदारांच्या पाठपुराव्याचे काय झाले..
जळगाव : मुंबईची विमानसेवा सुरू झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी लगेच पुण्याची विमानसेवा सुरू करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले होते. तसा त्यांनी मध्यंतरी प्रयत्न केल्याचेही वृत्तपत्रातून वाचण्यात आले. मात्र, पुढे काय झाले, विमान कंपन्या सेवा सुरू करण्याबाबत उत्सुक आहेत की नाही, याची कुठलीही माहिती वृत्तपत्रातून वाचण्यात आली नाही, अशा प्रकारची पुण्याच्या विमानसेवेवर खमंगदार चर्चा सोमवारी फुले मार्केटसमोरील एका चहाच्या टपरीवर दोन ज्येष्ठ नागरिकांमध्ये रंगली होती.
या चर्चेमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाने भाग घेऊन, अहो हे नेते मंडळी हे सुरू होणार, ते सुरू होणार याबाबत फक्त चर्चा करत असतात आणि नागरिकांना आश्वासन देत असतात. पुण्याच्या विमानसेवेबाबत दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, अद्यापही ही सेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे पुण्याच्या विमानसेवेवर चर्चा करण्यापेक्षा, निदान मुंबईची विमानसेवा तरी दररोज सुरू ठेवण्यासाठी खासदारांनी प्रयत्न केले पाहिजेत, असा मुद्दा मांडला. त्यांच्या या मुद्यावर या तिन्ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये शहरातील इतर विकास कामांबाबतही चांगलीच चर्चा रंगली होती. टपरीवर चहा पिण्यासाठी येणारे नागरिकही काहीवेळ ही चर्चा ऐकत होते.