कुजबूज प्रादेशिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:19 AM2021-08-23T04:19:07+5:302021-08-23T04:19:07+5:30
यावर्षी पावसाळा चांगला असल्याचा अंदाज हवामान खात्याने पावसाळा लागण्यापूर्वीच वर्तविला होता. या हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकरी वर्ग अगोदरच पेरणीचे ...
यावर्षी पावसाळा चांगला असल्याचा अंदाज हवामान खात्याने पावसाळा लागण्यापूर्वीच वर्तविला होता. या हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकरी वर्ग अगोदरच पेरणीचे नियोजन करू लागला होता. परंतु पावसाची सुरुवातच रिमझिम झाली. तरीही शेतकऱ्यांनी विहिरीच्या तोडक्या पाण्यावर कपाशी, मका, भेंडी, मिरची इ. पिके पेरली व ती आजपर्यंत जगवली. परंतु पावसाळा लागून तीन महिने झाले तरी दमदार पाऊस काही पडायला तयार नाही. त्यामुळे आजही पाझर तलाव, केटीवेअर, नाले, विहिरी कोरड्या ठाक आहेत. शेतकऱ्यांना आषाढ व श्रावण महिन्यात मुबलक पाऊस पडेल अशी आशा होती, परंतु आषाढ महिना पूर्ण कोरडा गेला व श्रावण महिना सुद्धा रिमझिम पावसात जाताना दिसत आहे. पुढे परतीच्या पावसाला सुरुवात होईल. दमदार पाऊस आलाच नाही तर पुढे पिकांना पाणी कसे द्यायचे व उत्पन्न कसे येईल? याची चिंता आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत मोठा खर्च केला आहे. केलेला खर्चही निघेल की नाही? या विवंचनेत शेतकरी पार खचला आहे. 'यंदा पावसायान काही खरं दिसत नही भो ' असेच शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
- भास्कर पाटील, महिंदळे, ता. भडगाव