मोठा कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:48 AM2018-07-07T01:48:56+5:302018-07-07T01:49:14+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘संस्कार दीप’ या सदरात जळगाव येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा विचारवंत प्रा.प्रभाकर श्रावण चौधरी यांनी बोधकथा लिहिल्या आहेत. त्यातील आज ‘मोठा कोण?’ ही वाचनीय बोधकथा नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
बंगालमध्ये एक महान सत्पुरुष होऊन गेले. तेच थोर संत, स्वामी विवेकानंद यांचे गुरू होते. स्वामी रामकृष्ण परमहंस हे त्यांचे नाव होते. स्वामी रामकृष्णांचा जन्म १८३६ मध्ये झाला. ते १८८६ मध्ये निवर्तले. तेव्हा स्वामी विवेकानंद पंचविशीच्या आत होते. आपल्या गुरूच्या स्मरणार्थ त्यांनी रामकृष्ण मठ ही संस्था स्थापन केली आहे. एकविसाव्या शतकातही तिचे कार्य सुरू आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा शिष्य परिवार फार मोठा होता. त्यांच्याकडे सतत लोक येत असत. आपले प्रश्न, आपल्या समस्या सांगत. त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत. त्यामुळे परमहंस लोकप्रिय होते. ते ज्ञानी होते.
एकदा त्यांच्याकडे त्यांचे दोन शिष्य आले. त्या शिष्यांमध्ये मोठा कोण? याबद्दल विवाद झाला होता. एक सन्यासदीक्षेने ज्येष्ठ होता. दुसरा ज्ञानाने मोठा होता. परंतु दोघे स्वत:ला मोठा समजत. एकाने म्हटले, मी मोठा, तर दुसरा म्हणे ‘तर मीही मोठा’! त्यावरून त्यांच्यात भांडणही होई. शेवटी आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी दोघे शिष्य स्वामी समस्येचे निराकरण करण्यासाठी दोघे शिष्य स्वामी परमहंसाकडे आले. दोघांनी आपापले म्हणणे त्यांच्यासमोर सांगितले. त्यासाठी आपापले तर्क दिले. तेव्हा परमहंसांनी मन:पूर्वक स्मित केले.
ते प्रसन्न भावमुद्रेने म्हणाले, ‘जो दुसऱ्याला मोठा मानतो, त्याला मोठा म्हणावे. आता तुम्हीच ठरवायचं आहे तुमच्यात मोठा कोण आहे ते!’ दोन्ही शिष्यांनी गुरूंचा निर्णय ऐकला. आता ते परस्परांना मोठा म्हणू लागले. स्वत:कडे लहानपण घेऊ लागले. जो सन्यासदीक्षेने ज्येष्ठ असल्याने स्वत:ला मोठा समजत होता, तो म्हणू लागला. ‘डोक्यावरील केसांचे मुंडण केल्याने काय होते फारसे? म्हत्त्वपूर्ण तर ज्ञानच आहे. तुम्ही माझ्यापेक्षा अधिक शास्त्रांचा अभ्यास केला आहे. तुम्ही प्रभावी प्रवचनकार आहात. तुम्हीच मोठे आहात’. दुसरा म्हणाला, ‘नाही बंधू, शास्त्रे अभ्यासून काय फार मोठे मिळते हो. संन्यासदीक्षा घेऊन साधना करणे महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही साधनेने मोठे आहात. म्हणून तुम्ही श्रेष्ठही आहात.
आतापर्यंत ‘मी मोठा’ म्हणून ते झगडत होते. आता ते दुसºयाला मोठा म्हणत होते. मी नाही, तुम्हीच मोठे, अशा जिद्दीवर ते आले. अगोदर कटुता होती. आता गोडवा आहे. अगोदर आग्रह, अहंवृत्ती होती, आता नम्रता व माधुर्य आहे. हे परिवर्तन का घडले. दृष्टी बदलली. घटनांचा संदर्भ बदलला. अर्थ बदलला. त्यामुळे जीवन समपातळीवर आले. मन विशाल बनले. म्हणजे जीवन सुखमय व शांतीमय बनते.
- प्रा.प्रभाकर श्रावण चौधरी