‘त्या’ ३६ जणांना कोणाचे अभय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:14+5:302021-07-03T04:12:14+5:30

बेसमेंट पार्किंगबाबत सुनावणी होऊन कारवाईचे आदेश असतानाही रखडली कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला ...

Who cares for those 36 people? | ‘त्या’ ३६ जणांना कोणाचे अभय?

‘त्या’ ३६ जणांना कोणाचे अभय?

Next

बेसमेंट पार्किंगबाबत सुनावणी होऊन कारवाईचे आदेश असतानाही रखडली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला असून, अनेक मार्केटसमोर पार्किंग नसल्याने वाहनधारकांना नाइलाजास्तव आपली वाहने रस्त्यालगत उभी करावी लागत आहेत. दुसरीकडे रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेसमेंट पार्किंगच्या विषयावर मनपाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे बेसमेंट पार्किंगबाबत नोव्हेंबर २०२० मध्ये १३३ जणांची सुनावणी झाल्यानंतर नगररचना विभागाने ३६ जणांवर कारवाई करण्याचे सकारण आदेश काढले होते. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून मनपाकडून कारवाई करण्यात आलेली नाही.

मनपाने तीन दिवसांपूर्वी शहरातील दुमजली इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याने तोडले होते. याबाबत नगररचना विभागाने सकारण आदेश काढल्याने ती कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून करण्यात आली होती. मात्र, बेसमेंट पार्किंगच्या विषयावर मनपाने सुनावणी प्रक्रिया घेऊन शहरातील ३६ जणांवर कारवाई करण्याचे आदेश मनपाने नोव्हेंबर २०२० मध्ये काढले होते. मात्र, याबाबत मनपाकडून अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत ३६ जणांना मनपाकडून अभय देण्याचे काम का सुरू आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

नगररचना विभागाने गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यात १३३ जणांचे सर्वेक्षण केले होते. त्यातील ३६ जणांची सुनावणी घेतल्यानंतर बांधकाम परवानगी घेताना पार्किंगसाठी जागा नमूद असतानाही त्या ठिकाणी व्यावसायिक वापर होत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या ३६ जणांवर कारवाई केली जाणार असल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे होते. मात्र, मनपाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. एकीकडे कोरोनाच्या नावाखाली हॉकर्सला टार्गेट केले जात असताना, बड्या व्यावसायिकांना अभय देण्याचे काम मनपाकडून का सुरू आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मनपा विरोधी पक्षनेतेही गप्प का?

चार महिन्यांपूर्वी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी आपले वाहन रस्त्यालगत उभे केले होते. त्या वेळी वाहतूक शाखेने त्यांचे वाहन जप्त करून, त्यांच्यावर दंड ठोठावला होता. बेसमेंट पार्किंग नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगत महाजन यांनी बेसमेंट पार्किंगबाबत कारवाई करण्यात यावी यासाठी मनपाला १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, तरीही मनपाने कोणतीही कारवाई केली नाही. आता मनपात शिवसेनेची सत्ता असून, विरोधी पक्षनेत्यांची पत्नी महापौर आहेत. आता तरी विरोधी पक्षनेते याबाबत कारवाईसाठी मनपाला अल्टीमेटम देऊन कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आयुक्तांचीही दिसून आली हतबलता

बेसमेंट पार्किंगच्या प्रश्नावर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना विचारले असता, त्यांनी या प्रकरणी लक्ष घालू, एवढे सांगत याविषयी बोलणे टाळले. त्यामुळे या विषयावर मनपा प्रशासनावर दबाव असल्याचेही स्पष्ट होत आहे. पावसाळ्यात मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई न करण्याचा शासन निर्णय आहे, असे असताना मनपाने बालाजी पेठेतील इमारत तोडली; मग आता बेसमेंटबाबत कारवाई का नाही?

Web Title: Who cares for those 36 people?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.