मेहरुण तलावातील पाणी उपशावर नियंत्रण कुणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:48+5:302021-05-30T04:14:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराचे वैभव आणि ऐतिहासिक तलाव अशी नोंद असलेल्या मेहरुण तलावाचे पाणी सात ते आठ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराचे वैभव आणि ऐतिहासिक तलाव अशी नोंद असलेल्या मेहरुण तलावाचे पाणी सात ते आठ फुटांनी कमी झाले आहे. मेहरुणचे पाणी शहरातील कोणत्याही सार्वजनिक कामांसाठी वापरले जात नाही. यंदा कडक उन्हाळा नाही. त्यामुळे एवढ्या पाण्याचे बाष्पीभवन नेमके झाले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरातील रहिवाशांनी केलेल्या बोअरिंगमधून अमर्याद उपसा केल्याने तलावातील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे. मात्र, या पाण्याच्या पातळीची नोंद सध्या कुणाकडेच नसल्याचे दिसून आले आहे.
भूजलाचे व्यवस्थापन करणाऱ्या वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने ही बाब शहराच्या हद्दीत येत असल्याने, आमचा त्याच्याशी संबंध येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मेहरुण तलाव हा जळगाव शहर महापालिकेच्या हद्दीत येतो. मात्र, त्याबाबत विचारणा केली असता, महापालिकेचे अभियंता अरविंद भोसले यांनीही संपूर्ण माहिती देण्यात असमर्थता दर्शविली. त्यामुळे या तलावाच्या पाण्याच्या पातळीकडे आणि आसपासच्या भागात होत असलेल्या बोअरिंगच्या उपशाकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे समोर आले आहे.
राज्यातील भूजल अधिनियमानुसार नैसर्गिक जलस्रोतापासून १०० फूट अंतरापर्यंत बोअरिंग करता येत नाही. मात्र, हा नियम मेहरुण तलावाच्या आसपास पायदळी तुडविण्यात आला आहे. परिसरातील रहिवाशांनी या भागात अमर्याद पाणी उपसा केला आहे.
बोअरिंगच्या परवानगीचे काय?
महापालिकेचे अभियंता अरविंद भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, गेल्या सात ते आठ महिन्यांत बोअरिंगसाठी कोणतेही प्रस्ताव आलेले नाहीत. कुणी बोअरिंगसाठी परवानगी घेतल्याचेही समोर आलेले नाही. मात्र, मेहरुण तलावाच्या भागात अंबरझरा पाटचारीला लागून असलेल्या रहिवासी भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे तलावाला लागूनच बोअरिंग खोदण्यात आली आहे. त्याशिवाय इतर ठिकाणी रहिवाशांनी बोअरिंग खोदून पाण्याचा अमर्याद उपसा केला आहे.
कोट - मेहरुण तलाव हा महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यामुळे त्याच्या पाण्याच्या पातळीवरील नियंत्रण हे जळगाव शहर महापालिकेकडेच असते. आमचा विभाग हा भूजल पातळीशी संबंधित काम करतो.
- अनुपमा पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक, जळगाव
कोट -
गेल्या काही दिवसांपासून तलावातील पाण्याची पातळी सातत्याने कमी होत आहे. परिसरातील नागरिक या पाण्याचा अमर्याद उपसा करत आहेत. त्यामुळे तलावातील पाणी कमी होते.
- विजयकुमार वाणी.