मनपातील भूसंपादनाच्या ‘तुंबाळ’ मधील ‘हस्तर’ नेमका कोण..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:29 PM2018-12-09T12:29:58+5:302018-12-09T17:12:06+5:30
भूसंपादनाच्या विषयाला सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्ष शिवसेना यांच्याकडून विरोध
अजय पाटील
जळगाव : मनपाची ३० नोव्हेंबर रोजी तहकूब झालेली महासभा ७ डिसेंबर रोजी घेण्यात आली. या महासभेपूर्वी मनपा प्रशासनाकडून मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या भूसंपादनाच्या विषयाला सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्ष शिवसेना यांच्याकडून विरोध होणार हे नक्की झाले होते.
उत्सूकता होती ती फक्त याच गोष्टीची की रहस्य ठरलेल्या भूसंपादनाच्या ‘तुंबाळ’ मधील नेमका ‘हस्तर’ आहे तरी कोण..? भाजपाचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी महासभेत तब्बल १ तास जळगाव शिवारातील ३३७ आर या जमीनीच्या झालेल्या गैरव्यवहाराची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीत ज्या जमिनीसाठी आधीच मनपाने (तत्कालीन नगरपालीकेने) जमीनमालकाला प्रति हेक्टर ३ लाख रुपये प्रमाणे मोबदला दिला आहे, ती जमीन मनपाच्या नावावर न करून घेण्यास केवळ नपाचे तत्कालिन अधिकारी, पदाधिकारी, मनपाचे विधी तज्ञ जबाबदार आहेत हे कैलास सोनवणे यांनी महासभेत मांडलेल्या मुद्यामधून दिसून येत आहे. तत्कालीन अधिकारी व मनपाच्या विधी तज्ञानी प्रामाणिकपणे लक्ष दिले असते तर मनपाला ११ लाख रुपयांच्या जमिनिसाठी (ज्या जमिनीसाठी मनपाने आधिच पैसे भरले आहेत) मनपाला आज १२ कोटी रुपये भरावे लागले नसते.
असो न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मानपाला हे पैसे भरावे लागणार आहेत. त्यासाठी मनपा प्रशासनाकडून हा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात आला. महासभेने हा प्रस्ताव नामंजूर केला.आता चार सदस्यीय समिती महासभेने तयार करण्याचा ठराव केला. या समितीकडून पुढे या प्रकरणी चौकशी करून न्यायालयात याचीका दाखल करण्याचे काम होणार आहे.
शुक्रवारी झालेल्या महासभेत भूसंपादन मधील खऱ्या सूत्रधाराचे रहस्य कायम राहिले आहे. आता भूसंपादनच्या ‘तुंबाळ’ मधील हस्तरच्या शोधासाठी पुढचा अध्याय सुरु होण्याची वाट पहावी लागणार आहे.