सोयरसुतक कुणाला...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 05:06 PM2019-01-27T17:06:54+5:302019-01-27T17:07:30+5:30
विश्लेषण
सुशील देवकर
बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा विक्रीतून उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, कांद्याला अनुदान वाढवून द्यावे, या मागण्यांसाठी एरंडोल तालुक्यातील खर्ची परिसरातील कांदा उत्पादक शेतकºयांनी शुक्रवार, २५ रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मोफत कांदे वाटप’ हे अभिनव आंदोलन केले. तब्बल ३ ट्रॅक्टर कांदा मोफत वाटप करण्यात आला. भाव मिळत नसल्याने उत्पादनखर्चही निघत नसल्याने वैतागलेला शेतकरी कांदा फुकट वाटून आंदोलन करीत असताना तो कांदा फुकटात मिळतोय, म्हणून घेण्यासाठी नागरिकांनी मात्र गर्दी केली होती. अगदी लोटालोटी करीत जास्तीत जास्त कांदा मिळेल, त्या पिशवीत, भांड्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू होता. हे चित्र पाहिल्यावर शहरातील नागरिकांना काबाडकष्ट करूनही नशिबी अवहेलना येणाºया शेतकºयाबद्दल, त्याच्या अडचणी, समस्या, वेदनांबद्दल काहीही सोयरसुतक नसल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. कांदा मिळताच विजयी मुद्रेने हे नागरिक आपल्या वाहनाकडे वळताना दिसत होते. नागरिकांच्या या मनोवृत्तीपेक्षा राजकारण्यांची मनोवृत्ती काही वेगळी आहे, असे नाही. त्यांनाही त्यांच्या राजकारणापेक्षा व मतांच्या गणितापेक्षा अधिक महत्वाचे काहीही नाही. त्यामुळेच शेतकºयांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. तर अधिकारी, प्रशासनाला शेतकºयांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला, त्यांच्या उपोषणस्थळी जाऊन चर्चा करायलाही वेळ नाही, अशीच परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ८ वेगवेगळे मंडप टाकून विविध समस्यांसाठी, मागण्यांसाठी नागरिकांनी, शेतकºयांनी उपोषण केल्याचे चित्र यंदा दिसून आले. मात्र तरीही प्रशासनाने अनास्था दाखविली. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारत सार्वभौम झाल्याच्या दिवसाचा आनंद सगळीकडे साजरा होत असताना काही लोक मात्र स्वत:च्या हक्कासाठी, अन्यायावर दाद मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत बसून होते.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे चळवळीतून पुढे आलेले असल्याने त्यांनी राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी केलेले आवाहन सकारात्मकपणे घेत आकाशवाणी चौकापासून पायीच उपोषणकर्त्यांपर्यंत जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. केवळ दिखाऊपणा नव्हे तर तब्बल अर्धा तास त्यासाठी दिला. हे त्यातल्या त्यात दिलासादायक म्हणावे लागेल.