मनपाच्या विकास योजनांमध्ये त्रुटी ठेवणारा झारीतील शुक्राचार्य कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:58+5:302021-08-14T04:20:58+5:30

कोट्यवधींचा भुर्दंड देणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय कोणाचे ? : मनपाचा भोंगळ कारभार अजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेतील ...

Who is the Shukracharya of Jhari who has erred in the development plans of the corporation? | मनपाच्या विकास योजनांमध्ये त्रुटी ठेवणारा झारीतील शुक्राचार्य कोण?

मनपाच्या विकास योजनांमध्ये त्रुटी ठेवणारा झारीतील शुक्राचार्य कोण?

Next

कोट्यवधींचा भुर्दंड देणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय कोणाचे ? : मनपाचा भोंगळ कारभार

अजय पाटील,

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेतील प्रशासकीय कामकाजातील चुकांचे वेगवेगळे प्रताप आता समोर येत असून, ठराविक अधिकारी ‘मोडस ऑपरेंडीस’ यामध्ये कार्यरत असल्याचेही दिसून येत आहे. ठराविक अधिकाऱ्यांकडून विविध योजना, विकास कामे व निविदांमध्ये वारंवार चुका करून किंवा मुद्दाम त्रुटी ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे महापालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड बसत असून, अशा चुका वारंवार करणाऱ्या मनपातील झारीतील शुक्राचार्याला कोणाचा राजाश्रय लाभत आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.

मनपातील ठराविक अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे मनपाला तर आर्थिक फटका बसतच आहे, मात्र, यामुळे त्या योजनांवर देखील परिणाम होत आहे. घनकचरा प्रकल्प असो वा मलनिस्सारण योजना, ही सर्व कामे लांबतच जात आहेत. यामुळे जळगावकरांना मनपा अधिकाऱ्यांच्या चुकांचा फटका देखील बसत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या चुका व बसलेला भुर्दंड

१. योजना - घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

झालेली चूक - इतर मनपांचा डीपीआर केला कॉपी-पेस्ट. तसेच न तपासता शासनाकडे पाठविला मंजुरीला.

बसलेला भुर्दंड - शासनाने जुना डीपीआर नामंजूर करून, नवीन डीपीआर तयार करण्याच्या दिल्या सूचना. तसेच नव्याने वाढीव खर्च टाकून, या १८ कोटींच्या खर्चाची जबाबदारी दिली मनपा प्रशासनावर. ३१ कोटींचा डीपीआर मनपाच्या चुकीमुळे झाला ४९ कोटींचा.

२. योजना - अमृतअंतर्गत भुयारी गटार योजना

झालेली चूक - भुयारी गटार योजनेसाठी निविदा तयार करताना योजनेंतर्गत रस्त्यांचे खोदकाम केल्यानंतर, त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी मक्तेदारावर न सोपविता ती महापालिकेवरच देण्यात आली.

बसलेला भुर्दंड - भुयारी गटार योजनेंतर्गत शहरातील सुमारे २२० कि.मी.चे रस्ते खोदण्यात आले. हे रस्ते नव्याने तयार करण्यासाठी मनपाला सुमारे १० ते २० कोटींचा खर्च येणार आहे.

३. योजना - अमृतअंतर्गत पाणी पुरवठा योजना

झालेली चूक - अमृतअंतर्गत पाणी पुरवठा योजनेंतर्गत नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा होणार आहे. यासाठी वॉटर मीटरची आवश्यकता राहणार आहे. मात्र, मनपाकडून निविदा तयार करताना निविदेत वॉटर मीटरचा उल्लेखच करण्यात आला नाही.

बसलेला भुर्दंड - नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा वॉटर मीटरशिवाय करूच शकत नाहीत. तसेच आता नव्याने वॉटर मीटर बसविण्यासाठी ९६ कोटींचा खर्च येणार असून, जोपर्यंत वॉटर मीटर बसणार नाही, तोपर्यंत जळगावकरांना २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य नाही. तसेच हा खर्चही मनपाला करावा लागणार आहे.

४. योजना - बायोमायनिंग प्रकल्प

झालेली चूक - आव्हाणे शिवारातील मनपाचा बंद पडलेला घनकचरा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी याठिकाणी अनेक वर्षांपासून पडलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एका संस्थेला ठेका देण्यात आला. ठेक्यासाठी निविदा काढताना प्रकल्पाच्या ठिकाणी पडलेल्या कचऱ्याचे अंदाजे माप घेण्यात आले. त्यानुसार तेच माप निर्धारित धरून, तेवढ्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करण्यासाठी निविदा काढण्यात आली.

बसलेला भुर्दंड - १ लाख मेट्रिक टन एवढ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने निविदा काढली. ठेकेदाराने मनपाने निश्चित करून दिलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर याठिकाणी अजून ८० हजार टनपेक्षा अधिक कचरा पडून आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुन्हा नव्याने काम सुरू करावे लागणार आहे.

चुका करणाऱ्या अधिकाऱ्याला कोणाचे अभय ?

मनपातील ठराविक अधिकाऱ्याकडूनच वारंवार चुका केल्या जात आहेत. मात्र, अशा अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई आतापर्यंत होताना दिसून येत नाही. मनपाला तब्बल ५० ते ७० कोटींचा भुर्दंड देऊनही अशा चुका करणाऱ्या अधिकाऱ्याची साधी चौकशी देखील मनपाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अधिकाऱ्याला कोणाचे अभय मिळत आहे का ? याचीही चौकशी होणे आता गरजेचे आहे. घनकचरा प्रकल्पाप्रकरणी महापौरांनी चौकशीचे आदेश दिले असून, या चौकशीत तरी चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Who is the Shukracharya of Jhari who has erred in the development plans of the corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.