कामचुकारांवर अंकुश ठेवणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 05:04 PM2019-02-16T17:04:28+5:302019-02-16T17:04:35+5:30
जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळणे महत्वाचे
हितेंद्र काळुंखे
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी नुकतीच भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील आरोग्य उप केंद्रास अचानक भेट दिली असताना हे केंद्र बंद असलेले आढळले. ही पाहणी ग्रामस्थांच्या तक्रारीवरुन करण्यात आली होती. हे केंद्र महिन्यातून एकदाच उघडते अशी तक्रार ग्रामस्थांची आहे. या तक्रारीची दखल जि. प. अध्यक्षांनी घेतली ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. एवढेच नाही तर इतर अनेक ठिकाणीही अचानक भेटी देवून पाहणी करण्याचे त्यांनी ठरवले आहे.
दरम्यान ही जबाबदारी संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे, त्यांचाच मात्र वचक व नियंत्रण नसल्याने असा प्रकार समोर आला आहे, अशीच प्रतिक्रिया या निमित्ताने उमटत आहे. दरम्यान ही बाब केवळ एका ठिकाणची समोर आली आहे. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही परिस्थिती असू शकते. ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय प्रश्नावर सर्वात मोठा आधार हा आरोग्य केंद्राचाच असतो. मात्र अनेक आरोग्य केंद्रांमध्ये कधी डॉक्टर हजर नसतात तर कधी हवी ती औषधी नसतात. कर्मचारी कमी असणे किंवा दांडीबहाद्दर आदी काहीही करणे असले तरी यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत असते. यास काही अपवादही आहेत. काही आरोग्य केंद्रांचे काम चांगलेही आहे. अशा आरोग्य केंद्रांचा आदर्श इतरांनी घेणे गरजेचे आहे, परंतु जे आपले कर्तव्य विसरत असलील अशांवर अंकुश कोण ठेवणार ? हा प्रश्न आहे.
माणूस म्हटला की, काही चांगले आणि काही वाईट अशा दोन्ही प्रवृत्तीचे लोक आढळतात. यासाठीच चुकीच्या बाबींवर अशांवर नजर ठेवणे आवश्यक असते. मात्र ज्यांच्यावर ही जबाबदारी असते ते देखील आपली जबाबदारी पार पडत नसले तर इतरांना ते फावते. ही बाब लक्षात घेता चुकीच्या गोष्टींना आळा घालत जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळणे हेच महत्वाचे आहे.